
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
Khanapur: Building that served patients for 60 years razed to the ground माणसाच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की, विकासाच्या नावाखाली इतिहास पुसला जात आहे. दशकानुदशके दु:ख, आनंद, वेदनांच्या आठवणी कवेत घेऊन उभ्या असणाऱ्या शासकीय इमारती जमिनदोसस्त होत आहेत. पण, त्याचे कुणालाच कांही वाटत नाही. एकेकाळी लोकवर्गणीतून उभी राहिलेली खानापूर शहरातील पूर्वाश्रमीची ‘समुदाय आरोग्य केंद्रा’ची जुनी इमारत निवृत्तच झाली नाही; तर जमिनदोस्त सुध्दा होत आहे. या इमारतीशी तालुक्यातील अनेकांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. जिर्ण न झालेली ही इमारत जमिनदोस्त करण्याऐवजी तिचा इतर कोणत्याही शासकीय कामकाजासाठी करता आला असता. पण..
स्वातंत्र्योत्तर काळात खानापूरात १९६० च्या सुमारास समुदाय आरोग्य केंद्राची कौलारू इमारत उभी राहिली. हिवताप, पडसं असे आजार होण्याच्या काळात या इमारतीत शेकडो रुग्णावर उपचार होत. कालांतराने म्हणजेच १९७० साली याच इमारतीत बाळंतपणासाठी म्हणून चार-पाच स्लॅबच्या खोल्या उभारण्यात आल्या. विशेष म्हणजे यासाठी सरकारने दिलेला निधी अपुरा पडत होता, म्हणून खानापूर तालुकावासीयांनी पदरमोड केली होती. अनेक संघ-संस्थांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत केली होती. त्याकाळातील प्रसिध्द कंत्राटदार कृष्णा खानापूरी यांनी त्यांचे बांधकाम केले होते.

खानापूर तालुक्याची लोकसंख्या वाढत गेली, तशी सरकारी इस्पितळाची व्याप्तीदेखील वाढत गेली. समुदाय आरोग्य केंद्राचे प्राथमिक आरोग्य केंद्र झाले. पुढे ते तालुकास्तरीय आरोग्य केंद्र बनले. याच दरम्यान, २००७ साली इमारतीत खोल्या आणि वेगवेगळ्या विभागांची वाढ झाली. एक-दोन डॉक्टरांच्या जागी वेगवगेळ्या आजारावरील वेगवेगळे डॉक्टर रुजू झाले. पण, कौलारू इमारत खमकेपणाने रुग्णांच्या सेवेत उभी होती. अलिकडे १०० खाटांचे भले मोठे हॉस्पिटल उभे राहिल्यानंतर मात्र ही इमारत कुचकामी ठरली.
६० वर्षांच्या काळात सुरूवातीला हिवताप आणि पडसं सोडलं तर इतर कोणताच आजार वा रोग लोकांना माहिती नव्हता. हळूहळू काळाचे चक्र फिरत गेले आणि आरोग्य केंद्राने कात टाकली. त्याचे रुग्णालय आणि पुढे हॉस्पिटल झाले. या काळात अपघातात जखमी झालेले विव्हळत येणारे रुग्ण, अन्य कोणत्या आजाराने ग्रस्त होऊन अस्वस्थ असणारे रुग्ण आले. मयतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहिला. बाळंतीणीच्या वेदना आणि प्रसुतीनंतरचा हर्षदेखील या रुग्णालयाने पाहिला. उपचारानंतर चेहऱ्यावर हसू आणून इस्पितळाबाहेर पडणारे हजारो रुग्ण या इमारतीने पाहिले. अलिकडे तर खाजगी इस्पितळात होते, तशी रुग्णांची लूटदेखील या इस्पितळाने अनुभवली. एकदा तर इस्पितळात रुग्ण तडफडत असतांना ‘रम-रमा-रमी’सह पार्टीत रमलेले डॉक्टर आणि कर्मचारी सुध्दा या इमारतीने पाहिले होते. कोरोना महामारीच्या काळात अनेकांची जिवनदायीनी ठरलेली ही इमारत अखेरचा निरोप घेत आहे.

खानापूरच्या ज्या इमारतीने सहा दशके खानापूर तालुकावासीयांची सेवा केली. ती इमारत गेल्या दोन दिवसांपासून सरकारी आदेशाने जमिनदोस्त केली जात आहे. यानिमित्ताने जुन्या – जाणत्या मंडळींकडून या इमारतीतील बऱ्या – वाईट प्रसंगांची आठवण ताजी होतांना दिसत आहे. पण, नव्याने उभारलेल्या इमारतीत पुढील पिढीला अधिक चांगले उपचार मिळतील, या निरागस भावनेतून ती जुनी इमारत जमिनदोस्त होतांना पाहण्यापलिकडे कांहीच नससल्याची हतबलता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते. त्याचबरोबर नव्याने उभ्या राहिलेल्या ‘हॉस्पीटल’मध्ये १९६० साली उभ्या राहिलेल्या इमारतीतील प्रेम, जिव्हाळा, सहाणुभूती आणि आधार नव्या इमारतीत ‘औषधा’ला तरी मिळेल का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतो.


कन्नड सक्ती विरोधी मोर्चात सामील व्हा; म. ए. समितीकडून जांबोटीत जागृती
समांतर क्रांती / जांबोटी कर्नाटक सरकारने बेळगावसह संपूर्ण सीमा भागात कन्नडसक्ती लागू करण्याचे धोरण अवलंबले आहे. मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कानडीबरोबर मराठीमधूनही सरकारी परिपत्रके उपलब्ध करून द्यावी. सक्तीचे कानडीकरण थांबवावे या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी (ता.11) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. […]