
समांतर क्रांती / विशेष
चेतन लक्केबैलकर, खानापूर
खानापूर आणि जोयडा तालुक्याच्या सीमावर्ती गावांमध्ये अल्पवयीन तरूणींना नोकरीचे आमिष दाखवून परराज्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोंढा पोलीस स्थानक हद्दीतील एका गावातील तब्बल ९ अल्पवयीन तरूणींना मागील काही आठवड्यांत परराज्यात पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. रामनगर पोलीस स्थानक हद्दीतील काही गावातील मुलींचे पालक सुध्दा या अमिषाला बळी पडले आहेत.
अचानकपणे अल्पवयीन तरूणी शाळेत जायच्या बंद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला असून अद्याप याबाबत पोलिसात रितसर तक्रार नोंद झालेली नाही. रामनगर आणि लोंढा परिसरात तरूणींच्या पालकांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून आधी गोव्यात आणि नंतर कोलकत्याला तरूणींची तस्करी करणारी एजंटांची टोळी कार्यरत असल्याची चर्चा आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील काही ठग या भागात सक्रिय असून स्थानिकांना एजंट म्हणून वापरले जात आहे. हे एजंट मुली आणि त्यांचे पालक यांना मोठ्या पगाराचे खोटे आश्वासन देऊन मुली परराज्यात पाठवतात. एका मुलीमागे १२ हजार रुपयांपर्यंत दलाली मिळते, अशी चर्चा आहे. त्यामुळे दलालीचे जाळे व्यवस्थितपणे काम करत असल्याचा संशय आहे.
मुलींना प्रथम गोवा येथे नेले जाते. त्यानंतर त्यांना अधिक कमाईचे आमिष दाखवून कोलकाता सारख्या महानगरांमध्ये शरिरविक्रयासारख्या वाम मार्गाला लावले जात असल्याची चर्चा असून याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. यावरून हा प्रकार केवळ छोटे-मोठे रोजगाराचे व्यवहार नसून मोठ्या प्रमाणावरची मानवी तस्करी असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुलींची तस्करी गोव्याहून कोलकत्ता..
अल्पवयीन मुली गायब होणे, पालकांना फसवणे, स्थानिक एजंटांचा सहभाग, परराज्यातील संशयास्पद ठिकाणी मुलींचे वास्तव्य या सर्व गोष्टींमुळे हा प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणात पोलीस, बालकल्याण समिती आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ज्या शाळांमध्ये अल्पवयीन तरूणी अचानक जाणे बंद झाले आहे. त्यांच्याबाबत चौकशी करणे गरजेचे बनले आहे.
पालकांना आमिषे; स्थानिकच एजंट..
एजंट म्हणून पूर्वी घरकामासाठी गोव्यात गेलेल्या मुली आणि स्थानिक बेरोजगारांचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. हे एजंट तुमच्या मुली शिकून काय करणार, त्यापेक्षा आताच त्यांना नोकरीला पाठवा, असे सांगून पालकांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवतात. त्याला बळी पडून पालकांनी आपल्या मुलींना या एजंटमार्फत कामाला पाठवले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तरूणी रामनगर येथील शाळेच्या विद्यार्थीनी..
अर्धवट शाळा सोडून परराज्यात कामासाठी पाठवण्यात आलेल्या अल्पवयीन सर्व मुली रामनगर पोलीस स्थानक हद्दीत असलेल्या शाळांमध्ये शिकत होत्या. त्यात खानापूर तालुक्यातील कांही गावांतील मुलींचाही समावेश आहे. मात्र, अचानक त्या शाळेत येणे बंद झाल्याने शिक्षकांनाही त्या कुठे गेल्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तरूणींच्या तस्करीचा हा प्रकार उघडकीस आला असून प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ याची दखल घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

नागुर्डा येथे निलावडे केंद्राच्या प्रतिभा कारंजी स्पर्धा संपन्न
समांतर क्रांती / खानापूर निलावडे केंद्राच्या विभागीय प्रतिभा कारंजी स्पर्धा नागुर्डा मराठी शाळेत पार पडल्या. यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष वासुदेव महाजन होते. या स्पर्धांमध्ये 18 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुरूवातीला नागुर्डा शाळेचे मुख्याध्यापक आर. के. मादार यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. सरस्वती पूजन केल्यानंतर बोलतांना निलावडेच्या सीआरपी नाझनीन जमील […]