
समांतर क्रांती / खानापूर
अलिकडेच उच्च न्यायालयाने येथील तहसिलदार दुंडाप्पा कोमार यांच्या बदलीचे आदेश बजावले होते. त्यानुसार त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी कांही दिवसांपूर्वीच मंजुळा नाईक यांनी पदभार स्विकारला होता. पण, आज दुपारी तहसिलदार मंजुळा नाईक या जेवायला गेल्यानंतर तहसिलदार दुंडाप्पा कोमार यांनी चित्रपटाला शोभेल अशी ‘एन्ट्री’ मारून थेट तहसिलदारांच्या खुर्चीवर कब्जा केला. सुरूवातीला कर्मचाऱ्यांना हा काय प्रकार आहे, तेच समजले नाही.
तहसिलदार मंजुळा नाईक या कार्यालयात आल्यानंतर तहसिलदार दुंडाप्पा कोमार यांनी सवोच्च न्यायालयाने ‘न्यायालयीन आवमान आदेशा’ला स्थगिती दिली असल्याचे सांगत तहसिलदारांच्या खुर्चीवर त्यांचा दावा जाहीर केला. वाद वाढल्यामुळे प्रांताधिकारी श्रवणकुमार नाईक यांनी तातडीने तहसिल कार्यालयाला धडक देऊन दोघांकडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी लोकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सांगून गुंता सोडविण्याऐवजी अधिकच वाढविला आहे.
दरम्यान, याठिकाणी हजर झालेले वकील संघटनेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ॲड. आय. आर. घाडी यांनी श्री. कोमार यांना जरी ‘सर्वोच्च’ दिलासा मिळाला असला तरी त्यांनी येथील कार्यभार स्विकारावा का? याबाबत महसूल सचिव निर्णय घेतील, तोपर्यंत प्राताधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकांची गैरसोय होणार नाही, यासाठी ते कुणावरही कार्यालयीन जबाबदारी सोपवू शकतात, असे मत मांडले.
एकंदर, सध्या दोघांच्या भांडणात खानापूर तालुका मात्र प्रशासकीयदृष्ट्या पोरका झाला आहे. गेल्या वर्षभरात दोन तहसिलदारांची तालुक्यातून गच्छंती झाल्यानंतरही पुन्हा – पुन्हा हाच कित्ता गिरवला जात असल्याने स्थानिक नेतृत्वाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन वर्षात अशा घटना वारंवार घडत असून याला येथील राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनता करीत आहे.
खानापूरच का पाहिजे?
दुंडाप्पा कोमार यांची बदली करण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी त्यांच्या बदलीचा आदेश झाला आणि त्यांच्या जागी मंजुळा नाईक यांची वर्णी लागली. दुंडाप्पा कोमार यांना इतरत्र कुठेही तहसिलदार म्हणून ‘मानसन्मान’ मिळालाच असता; पण, ते थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. हा इतका अट्टाहास का? यापूर्वीही वर्षभरापूर्वी लोकायुक्तांनी कारवाई केलेल्या तहसिलदारांनी न्यायालयातून आदेश आणून खानापुरातच वर्णी लावून घेतली होती. त्यामुळे यांना खानापूरच का पाहिजे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लाखांचे अधिकारी महागात..
अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी लाखोंचे साटेलोटे होते, हे ‘ओपन सिक्रेट’ आहे. येथील आमदार म्हणतात, आम्ही त्या अधिकाऱ्याची शिफारसच केली नव्हती. मग, या ‘लाचखोर’ अधिकाऱ्यांची शिफारस कोण करतो? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘ते काय बाईंचे आहेत.’ असे चर्वितचर्वण सध्या तालुकाभर सुरू असून त्याला साजेशी ‘वकीली’ आजच्या प्रकरणात ॲड. घाडी यांनी केल्याने या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना आणताच कशाला? असा सूर तालुकावासीयांतून आळवला जात आहे.

.. तर मग मल्लिकार्जून खर्गेंना मुख्यमंत्री करा!
समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाचे राजकारण शिगेला पोहचले आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी पराकाष्ठा चालविली आहे. पण, हा तिढा न सुटल्यास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. राज्य काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी तेव्हा आडून बसलेले प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी […]