
समांतर क्रांती / खानापूर
Elephant crisis heading towards Khanapur दांडेलीतून खानापूर तालुक्यात आलेल्या हत्तींचे कळप नागरगाळी, गोधोळी, गोदगेरी, सुलेगाळी, हलगा तसेच तिनईघाट, पाली, डोंगरगाव, तिओली, गुंजी, संगरगाळी, माणिकवाडी असा प्रवास करून शहरापासून चार कि.मी. अंतरावरील सावरगाळी परिसरात दाखल झाले आहेत. दरम्यानच्या काळात सुलेगाळी येथे विद्यूत तारांचा स्पर्श झाल्याने महिनाभरापूर्वी दोन हत्तींचा मृत्यू झाला होता. तसेच आतापर्यंत हत्तींनी हजारो एकरमधील पिकांचे नुकसान केले असून सुमारे कोट्यवधींचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
शुक्रवारपासून (ता.२८) हत्तींनी सावरगाळी परिसरात मुक्काम ठोकला आहे. शनिवारी पाच हत्तींच्या या कळपाने सावरगाळी येथील नागाप्पा गुरव आणि नारायण कापोलकर यांच्या शेतातील भातवळ्यांची धुळधाण केली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची वर्षभराची महेनत पाण्यात गेली आहे. त्याशिवाय मोठा आर्थिक फटका बसला आहे. हत्तींनी भाताची नासाडी तर केलीच, पण भाताच्या वळीखाली अंथरण्यात आलेली तटे पार जंगलात फेकून दिली आहेत. हत्तींच्या या आक्रमकपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हत्ती खानापूरच्या दिशेने?
गतवर्षी सावरगाळीत धुमाकूळ घातलेल्या हत्तींनी नंतर आनंदगड ओलांडून नंदगडच्या शिवारात ठाण मांडले होते. यंदा सावरगाळीतील हत्ती गतवर्षी प्रमाणेच नंदगडच्या शिवारात जाणार की, खानापूरच्या दिशेने येणार? याकडे शेतकरी आणि वनखात्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जनजागृती; उपायांकडे मात्र दुर्लक्ष
सुलेगाळी येथील दुर्घटनेनंतर हत्तींना इजा होऊ नये, यासाठी ग्रामस्थांमध्ये जागृती केली जात आहे. त्यासाठी हत्तींपासून वाचण्याचे उपाय सांगितले जात आहेत. त्यासाठी गावोगावी बैठकांचे आयोजन वनाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. हत्तींना हुसकावण्यासाठी फटाके फोडू नका, दगड मारून त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन केले जात आहे. पण, हत्तींना लोकवस्तीपासून दूर जंगलात हुसकावून लावण्यासाठी वनखात्याकडून कोणत्याच उपाययोजना आखण्यात आलेल्या नाहीत.
नुकसान भरपाईत वाढ; पण..
वनखात्याने हत्तींनी केलेल्या नुकसानीच्या भरपाईत वाढ केली आहे. पण, योग्य प्रकारे पंचनामा करून वेळेत भरपाई मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी बेदरकारपणे वागत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष आणि समाजसेवी संघटना मात्र या हत्ती समस्येवर चिडीचूप आहेत.

खानापूरकर हो! चलो बेळगाव.. समितीची हाक
समांतर क्रांती / खानापूर बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये भरविले जाते. हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाला विरोध म्हणून पुढील सोमवारी (ता.८) मराठी भाषिकांकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषक नागरिकांनी या महामेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात […]