
समांतर क्रांती / खानापूर
आम्हाला स्थलांतर करायचेच नाही, पण केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे आम्ही स्थलांतराचा निर्णय घेतला. आम्हाला सुविधा द्या, आम्ही येथेच राहतो, असे भीमगड अभयारण्यातील वननिवासींनी उपस्थित नेत्यांना सुनावले. या बैठकीला जेमतेम शंभर नागरीक उपस्थित होते. त्यामुळे जरी स्थलांतराला विरोध करण्यात आला तरी खरंच भीमगड अभयारण्यातील जनता या ठरावाला मान्यता देणार का? हा प्रश्नच आहे.
स्थलांतराला विरोध करीत आज हेम्माडगा येथे स्थानिकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या दोन-तीन वर्षांपासून स्थलांतराबाबत चर्चा सुरू होती. तळेवाडीतील कुटुंबांनी वनमंत्र्यांच्या हस्ते धनादेश स्विकारून स्थलांतराची समंती दिल्यानंतर तालुक्यातील नेते आणि समाजिक कार्यकर्ते झोपेतून जागे झाले आहेत. ‘वनवासी कल्याण’चे कार्यकर्ते तसेच विधान परिषदेचे आमदार शांताराम सिध्दी यांनी आज वननिवासी नागरीकांशी संवाद साधला. हा प्रकारच मुळात वरातीमागून घोडे दामटण्याचा आहे.
यावेळी बोलतांना आमदार शांताराम सिध्दी यांनी स्थानिकांनी स्थलांतर करू नये, असे आवाहन केले. स्थानिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढा लढला जाईल असे ते म्हणाले. तर माजी आमदार सुनिल हेगडे यांनी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न न केल्याचा आरोप केला. विधीमंडळात चर्चा होतात, पण कार्यवाही होत नाही, अशी आजची स्थिती आहे, त्यामुळे आपला लढा आपणच लढला पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी आजच्या बैठकीला आमदार विठ्ठल हलगेकर का उपस्थित नाहीत? असा सवाल करीत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी राजकीय मखलाशी केली. यावेळी ॲड. एच. एन. देसाई, भाजपचे संजय कुबल, प्रमोद कोचेरी, ॲड. चेतन मणेरीकर, समिती नेते विलास बेळगावकर, महादेव शिवोलकर, विजय मादार, कृष्णा गुरव, अशोक देसाई, अप्पू शिंदे, भालचंद्र नाईक यांनी विचार मांडले.
उशिरा सुचलेले शहाणपण..
वनमंत्री खाड्रे यांनी तळेवाडी येथील कुटुंबांना धनादेशाचे वितरण केले. तेव्हा आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी फोटो काढून घेत चमकोगिरी केली होती. त्याचवेळी भाजपने विरोध का दर्शविला नाही? काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी स्थलांतरास विरोध करीत पाठींबा दर्शविला आहे. पण, यापूर्वीच त्यांनी त्यांच्या पक्षांच्या मंत्र्यांना याबाबत विरोध का केला नाही? गेल्या दोन वर्षांपासून स्थलांतराचे भिजत घोंगडे असतांना तालुक्यातील समाजसेवक ‘कुंभकर्णा’सारखे का वागले? या सगळ्यांना आताच का जाग आली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आजवर यापैकी कुणीही वननिवासींना सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे आपणाला कुणीच वाली राहिला नाही, या भावनेतून वननिवासींनी स्थलांतराचा निर्णय घेतला. त्याला विरोध होत आहे, ही चांगली बाब आहे.

भीमगड अभयारण्यातील गावांच्या स्थलांतरात ‘एजंटराज’
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर भीमगड अभयारण्यातील गावांना सुविधा पुरविण्यात सरकार अपयशी ठरल्याने स्थानिकांनी स्वेच्छेने स्थलांतरास संमती दिल्याची बतावणी केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र स्थानिक पातळीवर स्थलांतराच्या मोहिमेसाठी ‘एजंटराज’ सुरू आहे. नागरीकांना भिती दाखवून त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडले जात आहे. सरकारकडून स्थलांतराबाबत विचारणा झाल्यानंतर भीमगड परिसरातील कांहीनी स्थलांतराचा विडा उचलला. स्थानिकांना जमिनी खरेदी करून […]