
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
खानापूर तालुक्याचा पश्चिम घाट हा संहिष्णू लोकांचा अधिवास. त्यांच्याकडून शासन यंत्रणेला कोणत्याच प्रकारचा धोका नाही. त्यामुळे या भागावर नेहमीच अनन्वित अन्याय होत आला आहे. त्याचाच परिपार म्हणून तेथील लोकांना आता स्थलांतर करावे लागत आहे. पण, एकदा हा पश्चिम घाट ऐन हिवाळ्यात पेटला होता. त्याची ही कौर्यगाथा..
१५ नोव्हेंबर २०१४ रोजी चिक्कमंगळूर येथे चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या ३६ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली. त्यानंतर त्या वाघाला जेरबंद करण्यात आले. वनखात्याने त्याला नरभक्षक जाहीर केले. असे असतांनाही तत्कालीन काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री आर. के. जॉर्ज यांचा मुलगा राणा जॉर्ज आणि व्याघ्र संरक्षण समितीचा सदस्य संजय गुब्बी यांनी त्या वाघाला आधी अनशीच्या अभयारण्यात सोडण्याचा प्रयत्न केला. पण तेथे विरोध झाल्यामुळे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नरभक्षक वाघ भीमगड अभयारण्यात सोडण्यात आला.
अरविंद पाटलांमुळे प्रकरण पेटले

२१ नोव्हेंबर २०१४ रोजी नरभक्षक वाघ तळेवाडी येथे सोडण्यात आला. त्याच्या गळ्यात कॉलर आयडी लावण्यात आली होती. ही घटना समजताच घटनास्थळी पोहचलेले तत्कालीन आमदार अरविंद पाटील यांनी अधिकाऱ्यांना अक्षरश: झाडाला बांधून घालत वाघाला पकडण्याची मागणी लावून धरली. वाघाचा माग कांही केल्या लागत नव्हता. दरम्यान, २४ नोव्हेंबर रोजी देगावच्या सावित्री पाटील यांच्यावर नरभक्षक वाघाने हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यात त्या बालंबाल बचावल्या. या वाघाने तब्बल ४४ दिवस भीमगड अभयारण्यातील जनतेसह वन खात्याची झोप उडविली होती.
.. आणि ती दुर्घटना घडली!

वाघाने ४४ दिवसात तब्बल २८ जंगली आणि पाळीव जनावरांचा फडशा पाडला होता. कॉलर आयडी असूनही त्याचा शोध लावण्यात वनखाते अपयशी ठरत होते. त्यामुळे नागरीकांचा संताप शिगेला पोहचला होता. तत्कालीन आमदार अरविंद पाटील रात्रीचा दिवस करून वाघाचा शोध घेत होते. याच दरम्यान २४ डिसेंबर २०१४ रोजी मुडगई येथे मळणी करण्यात व्यस्त असणाऱ्या हणबर कुटुंबीयांना दु:खाचा डोंगर कोसळला. नाल्यात पाणी आणायला गेलेल्या अंजना अप्पाण्णा हनबर (३६) गर्भवती महिलेचा नरभक्षक वाघाने फडशा पाडला. आणि तालुक्यातच नाही तर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली.
उशिरा सुचले शहाणपण..

आधीच त्या नरभक्षक वाघाला जंगलात सोडायला नको होते. पण, केवळ जॉर्ज यांचा मुलगा राणा आणि संजय गुब्बी यांचे ‘चोचले’ पुरविण्यासाठी काँग्रेस सरकारने आणखी एका महिलेचा हकनाक बळी घेतला होता. आमदार अरविंद पाटील यांनी याबद्दल सरकारला जबाबदार धरत वाघाला ठार केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठोस भूमिका घेत आंदोलन छेडल्याने तत्कालीन खासदार प्रकाश हुक्केरी यांनी सरकारच्यावतीने घटनास्थळी जाऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुमारे २२० जणांच्या पथकाने वाघाचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यात नक्षलविरोधी पथकाचे शार्पशुटर आणि वाघाच्या मलमुत्रावरून शोध घेणारे सोलिगा यांचा समावेश होता.
अखेर क्रुरकर्म्याचा खात्मा झाला..

सुरूवातीपासून खानापूरचे तत्कालीन वनक्षेत्रपाल एस. एस. निंगाणी यांनी वाघाच्या शोधासाठी स्वत: खांद्याला बंदूक लावली होती. तर अरविंद पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह जंगजंग पछाडत होते. त्यावेळी त्यानी घेतलेली भूमिका आजही त्यांच्या धडाडीची आठवण करून देते. वाघाचा शोध सुरू असताना २८ डिसेंबर २०१४ रोजी कोंगळा गावाजवळ वाघाला गोळ्या घालून ठार करण्यात आले.
अजुनही भय इथले संपत नाही..
नरभक्षक वाघाने गर्भवती महिलेचा बळी घेतल्याच्या घटनेला ११ वर्षे पूर्ण होतात. तरीही त्या काळातील ४४ दिवसांच्या आठवणींनी आजही अंगावर काटा येतो, असे या भागातील नागरीक सांगतात. दुसरीकडे त्यावेळी तत्कालीन खासदार प्रकाश हुक्केरी यांनी दिलेल्या एकाही अश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. आता भीमगड अभयारण्यातील गावांच्या स्थलांतरासाठी राज्य सरकार पयत्नशील आहे. त्यामुळे आता सरकारकडून दिली जाणारी अश्वासने पूर्ण होणार का? हा प्रश्नच आहे.

खानापूरचे तहसीलदार कोमार यांना पुन्हा दणका
समांतर क्रांती / खानापूर उच्च न्यायालयाने बदलीचे आदेश दिल्यानंतरही इर्षेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन खानापूरात वर्णी लावून घेतलेल्या तहसीलदार दूंडाप्पा कोमार यांना पुन्हा न्यायालयाने दणका दिला आहे. आता त्यांना पंधरा हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून सदर रक्कम त्यांनी त्यांच्या खिशातून याचिकाकर्त्याला देण्याचे आदेश बजावले आहेत. बसवराज कुर्तकोटी यांनी त्यांच्या मालमत्तेसंदर्भात निर्णयाला विलंब केल्याबद्दल न्यायालयात धाव […]