
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
‘Hule Company’ Ousted from Ganebail Toll Plaza. बेळगाव-पणजी महामार्गावरील गणेबैल टोल नाक्यावरील स्थानिक कर्मचाऱ्यांनी किमान वेतन मिळावे यासाठी आंदोलनास्त्र उगारले होते. त्याला न जुमानता हुळे कंपनीच्या कारभाऱ्यांनी अरेरावी चालविली होती. दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हुळे कंपनीलाच गुढीपाडव्यादिवशी ‘नारळ’ देण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे भुवनेश कुमार शुल्का यांनी हा निर्णय घेतला. बैठकीत गर्लगुंजी ग्रा. पं. माजी सदस्य प्रसाद पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजुने सडेतोड भूमिका मांडली. यावेळी कर्नाटक युवा रक्षण वेदिकेचे पांडुरंग गुळण्णावर आणि ॲड. पद्मानंद तळवार यांनीही कर्मचाऱ्यांची बाजू लाऊन धरली.
गणेबैल येथील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यास हुळे कंपनीने टाळाटाळ चालविली होती. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. प्राधिकारणाने आदेश दिल्यानंतरही कंपनीकडून सहकार्य करण्याऐवजी कर्मचाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. काँग्रेसकडून या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देण्यात येऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. तरीही, कंपनीकडून सहकार्य मिळत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आज गुरूवारी (ता.१९) प्रांताधिकारी श्रवणकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचारी आणि कंपनीने एक पाऊल मागे घेण्याचा सल्ला प्रांताधिकारी आणि महामार्ग प्राधिकारणाकडून देण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या बाजुने प्रसाद पाटील यांनी सुध्दा सुरूवातीला हा तोडगा मान्य केला. पण, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हेका सोडला नाही. त्यामुळे प्रसाद पाटील यांनी सदर टोल नाक्याचे कंत्राटदार बदला, अन्यथा टोलच बंद करा, अशी कठोर भुमिका घेतल्याने अखेर हुळे कंपनीची हकालपट्टी करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला.
यावेळी प्रसाद पाटील यांनी तोल पुन्हा सुरू झाल्यानंतर जुन्याच कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे. तसेच त्यांच्या बाजुने जिल्हा प्रशासन आणि प्रांताधिकाऱ्यांनी उभे राहायला हवे, असे मात मांडले. त्याला प्रांताधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. टोल वसुलीचे निविदा लवकरच काढून सध्या कार्यरत असलेल्या स्थानिक कर्मचाऱ्यांनाच टोल कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही प्राधिकरणाचे भुवनेश कुमार शक्ला यांनी दिली. तुर्तास, टोल ॲटो मोडवर वसुल केला जाईल, असेही ते म्हणाले. या संपूर्ण आंदोलनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची पाठराखण केली. हा मुद्दा ऐरणीवर आणला, त्यामुळे हुळे कंपनीची हकालपट्टी झाली. प्रसाद पाटील यांनी बैठकीत सडेतोडपणे हुळे कंपनीच्या कारभारावर ‘बोठ’ ठेवल्यानेच हा या आंदोलनाला यश आले असून आगामी काळातदेखील आपण नेहमीच कर्मचारी आणि स्थानिकांच्या पाठिशी ठाम असल्याचे मत प्रसाद पाटील यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना व्यक्त केले.

