
समांतर क्रांती / खानापूर
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील गुंजी गावाजवळ शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. अभय दीपक घाडी (20) रा. गुंजी ता. खानापूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दुचाकीवर मागे बसला होता. तर दुचाकीस्वार त्याचा मित्र वैभव अरुण सुतार (22) रा. गुंजी हा देखील गंभीर जखमी झाला आहे.
ते दोघेही खानापूर येथून गुंजीच्या दिशेने जात होते. यावेळी गुंजी गावच्या हद्दीत धामणेकर यांच्या पोल्ट्री फार्म जवळ मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दोघेही उडून रस्त्यावर आपटले. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते पंकज कुट्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस व रुग्णवाहिकेला माहिती दिली. दोघाही जखमींना बेळगाव येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असताना अभय घाडी याचा रविवारी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.
नजरचुकीने दुसऱ्या तरूणाचा फोटो व्हायरल..
खानापूर पोलीस फरार वाहनाचा शोध घेण्याचे काम करत आहेत. दरम्यान याबाबत काही प्रसिद्धी माध्यमातून नजरचुकीने अभय घाडी याच्या ऐवजी दुसऱ्या गावातील तरुणाचा फोटो छापला. त्यामुळे त्या तरूणाच्या कुटुंबीयांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. केवळ नजरचुकीने हा प्रकार घडला असून त्यामागे संबंधीत तरूणाच्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा खुलासा वृत्तपत्राने केला आहे.
मदतीचे आवाहन..
अपघातातील जखमी वैभव अरूण सुतार (२२) याच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याच्या कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची असून उपचारासाठी आवश्यक खर्चासाठी समाजातील दानशूरांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अपघातात पत्नी ठार, पती गंभीर
समांतर क्रांती / खानापूर हेम्माडगा रस्त्यावरील पाली परिसरात आज पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत ओल्ड गोवा येथे राहणाऱ्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत.मृत महिलेचे नाव जागृती हरिदास असे असून जखमी पतीचे नाव दत्तप्रसाद हरिदास आहे. हे दाम्पत्य सध्या गोव्यातील ओल्ड गोवा येथे वास्तव्यास होते. […]