
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
भीमगड अभयारण्यातील गावांना सुविधा पुरविण्यात सरकार अपयशी ठरल्याने स्थानिकांनी स्वेच्छेने स्थलांतरास संमती दिल्याची बतावणी केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र स्थानिक पातळीवर स्थलांतराच्या मोहिमेसाठी ‘एजंटराज’ सुरू आहे. नागरीकांना भिती दाखवून त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडले जात आहे.
सरकारकडून स्थलांतराबाबत विचारणा झाल्यानंतर भीमगड परिसरातील कांहीनी स्थलांतराचा विडा उचलला. स्थानिकांना जमिनी खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून हे एजंट नागरीकांची दिशाभूल करीत आहेत. एकाच गावातील कुटुंबाना एकाच ठिकाणी शहराजवळ जागे मिळवून देऊ, असे सांगून मोठी रक्कम उकळली जात आहे. प्रत्यक्षात हे एजंट तुटपुंज्या किमतीत जमिन खरेदी करीत आहेत. त्याशिवाय स्थानिकांच्या शेतजमिनी विकण्याचा घाटदेखील या स्थानिक एजंटांनी घातला असून लाखो रुपयांच्या शेतजमिनी कवडीमोलाने खरेदी केल्या जात आहेत. या एजंटांच्या माधध्यमातून परप्रांतीयांनी जमिनी घशात घालण्यासाठी कंबर कसली आहे.
स्थानिक पातळीवर राजकीय नेते म्हणून मिरविणारे हे एजंटच स्थलांतरासाठी स्थानिकांवर दबाव आणत आहेत. कोंगळा आणि गवाळीसह अन्य कांही गावातील ‘समाजसेवक’ एजंट बनून एकीकडे आपले कल्याण करून घेतांनाच दुसरीकडे वनखात्याची चमचेगिरी करीत आहेत. यापूर्वी हे एजंट वन्य प्राण्याची शिकार, लाकूड, वनौषधींची तस्करी करीत असत. भीमगडाला अभयारण्याचा दर्जा मिळाल्यानंतरही त्यांचे हे तस्करीचे धंदे सुरूच होते. मध्यंतरी या लोकांनी या भागातील शाळा, अंगणवाडी इमारतींची कंत्राटे घेतली होती. त्यात लाखोंचा घोटाळा केल्यानंतर आता ते ‘रिअल इस्टेट एजंट’ बनले आहेत. आधीच नवखात्याशी अर्थपूर्ण संबंध असलेल्या एजंटांनी आता खात्याची उतराई म्हणून लोकांना गावाबाहेर हाकलण्याचा ठेका घेतला आहे.
शिरोली, हेम्माडगा, कोंगळा, गवाळी येथे हे ‘दलाल’ कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत या भागातील शेतकऱ्यांना फसवून हजारो एकर शेतजमिनी परप्रांतीयांना विकून बक्कळ पैसा कमविला आहे. त्यांनी यापूर्वीच शहरात बस्तान बसविले असले तरी स्थानिकांना नाडविण्याचा त्यांचा धंदा राजरोस सुरू आहे. त्यात आता त्यांना स्थलांतराचे मोकळे रान मिळाले आहे. ज्या कुटुंबाला स्थलांतर करायचे नाही, त्यांना भिती दाखवून हे एजंट आपला कार्यभाग साधून घेत आहेत. मंगळवारी (ता.२) हेम्माडगा येथे झालेल्या संवाद कार्यक्रमात चमकोगिरी करण्यात सुध्दा हेच एजंट अग्रेसर होते.
भिमगड अभयारण्यातील नागरीकांनी एजंटांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या एजंटांकरवी होत असलेल्या शेतजमिनींच्या विक्री व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणीदेखील होत आहे.

गोलमाल है बाबा.. सब गोलमाल है!
समांतर क्रांती / खानापूर मराठा मंडळ महाविद्यालय ते करंबळ फाट्यापर्यंतच्या शहरांतर्गत महामार्गाच्या कामात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. रस्ताकामासाठी तब्बल १४ कोटींचा निधी मंजूर असतांना कंत्राटदाराने धुळफेक चालविली आहे. काँग्रेसने या प्रकाराला आमदार आणि खासदारांना जबाबदार धरत आराखड्याप्रमाणे रस्त्याचे काम करण्याची मागणी केली आहे. ‘वन टाईम डेव्हलपमेंट’मधून भक्कम रस्ता करण्याचे […]