चेतन लक्केबैलकर
नेता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून माजी आमदार अरविंद पाटील यांच्याकडे पाहता येईल. कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसतांना त्यांनी घेतलेली झेप अचंबित करणारी आहे. त्यांनी खानापूर तालुक्याच्या अर्थकारणाला नवा आयाम मिळवून दिला. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस.. त्यानिमित्त केलेली ही अक्षरपेरणी..
नेत्याची मदार कार्यकर्त्यांवर असते. थोडक्यात कार्यकर्ता हा नेत्याचा आत्माच असतो. कार्यकर्त्यांना सांभाळत समाजाभिमुख विकास आणि सामाजिक कार्याला वाहू घेत निश्चित ध्येय गाठणे, ही खर तर तारेवरची कसरत. खानापूरसारख्या निम्नसंवेदनशिल आणि द्विभाषीक तालुक्यात अशाप्रकारे कार्यकर्ते सांभाळून ध्येय गाठणे आणि तेही मागे कोणत्याही प्रकारची भक्कम अशी राजकीय पार्श्वभूमी नसतांना ही बाब तशी अवघडच. तरिही यात जो यशस्वी होतो, त्याची चिकाटी, धडपड, सामाजिक कार्याची आवड, अमर्याद उर्जा आणि जिद्दीला सलाम करावा लागेल. नेत्याच्या ठायी समयसुचकता, कार्यक्षमता, निर्णयक्षमता, समाजकारणाची आवड, विकासाबाबत आस्था आणि कार्यकर्ता सांभाळण्याची ताकद असावी लागते. खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील हे याबाबतीत खरे उतरले आहेत. म्हणूनच ध्येय्यासक्तीने झपाटून कार्य करण्याच्या त्यांच्या जिद्दीला सलाम!
260 खेडी, वाड्या-वस्त्यांनी अफाट पसरलेला खानापूर तालुका. एकाबाजुला निसर्गाने ओंजळ भरून अविष्कार केला आहे, तर दुसऱ्या बाजुला परस्परविरोधी अशी दुष्काळी स्थिती. एकाबाजुला मराठीची अस्मिता उराशी बाळगुन गेली 61 वर्षे प्राणपणाने लढणारा मराठी मावळा, तर दुसऱ्या बाजुला कानडी संस्कृती. अशा कितीतरी बाबी मांडता येतील ज्या तालुक्याचे सरळ-सरळ दोन भाग पाडतात. दुर्दैवाने यात समान असणारी गोष्ट एकच… दुर्गमता. दुर्गम हा तालुक्याच्या माथी लागलेला हा कलंक पुसता येणे कठीणच. त्यात अशिक्षितपणाचे काजळबोट अशोभनिय ठरावे असेच. तालुक्याचे नेतृत्व करतांना एखाद्याची काय अवस्था होत असेल याची कल्पना येण्यास हे पुरेसे आहे.
कै. अशोकराव पाटील यांनी खानापूर तालुक्यात सहकाराचे बीज पेरले. अरविंदरावांच्या प्रयत्नांतून आज त्यांची रोपटी बहरून गोड गोमटी फळे तालुकावासीयांना चाखायला मिळत आहेत. विकास आणि मुलभूत सोयी-सुविधांपासून कोसोमैल दूर राहिलेल्या खानापूर तालुक्यात माजी आमदार मान. श्री. अरविंद चंद्रकांत पाटील यांनी विकासाच्या नव्या पर्वाला सुरूवात केली. खानापूर तालुक्याचा विकास साधणे, हे मोठे आव्हान होते. परंतू त्यांनी ते लिलया पेलले. स्वातंत्र्योत्तर काळाच्या इतिहासात तालुक्याच्या पश्चिम घाटातील पाच गावात वीज पोहचली नव्हती. ती पोहचेल याबाबतची आशाही धुसर झाली होती. अरविंदरावांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावून या गावांना वीज देण्याचे ऐतिहासीक कार्य केले. ते त्यांच्यातील धडाडीचे गुणदर्शन घडविणारे ठरले. बिडी भागातील शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळत नाही, जे प्रस्ताव सरकारकडे गेले त्यांना केराची टोपली दाखविली गेली, म्हणून हिरमसून जातील ते अरविंदराव कसले? त्यांनी लोकांना उभे केले आणि स्वतः पुढाकार घेऊन रू. 3 कोटीच्या गोमारी प्रकल्पाला चालना दिली. प्रकल्प पूर्ण होऊन आज त्या भागात नंदनवन फुलते आहे. सुमारे 12 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली आली आहे. समांतर अशी व्यवस्था त्यांनी निर्माण करून अनेक समस्याग्रस्तांना न्याय दिला आहे. त्यांनी स्वयंस्फूर्तीने राबविलेल्या कित्येक योजना सांगता येतील. त्यांनी पाण्याला दिलेले महत्व आणि ते मिळवून देण्यासाठी चालविलेले भगिरथ प्रयत्न पाहता त्यांना जलपुरुष अशी उपमा देणे सार्थ ठरेल.
अडल्यानडलेल्याला त्याची भाषा, धर्म, जात न पाहता अरविंदराव त्याच्या मदतीसाठी धावून जातात. त्यांचे स्वतःचे वाहन हे रुग्णवाहिका आहे, की काय अशी शंका कांही वेळा येते. जेव्हा बघावे तेव्हा ते कुणाला ना कुणाला इस्पितळात घेऊन जातांना दिसतात. तालुक्यातील मराठी तरूणांना स्फूर्ती मिळावी, तरूण व्यसनांपासून दूर रहावा, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. गावागावात त्यांनी छ. शिवरायांचे पुतळे उभारले. कांही नेते आपले क्षेत्र ठरवून घेतात. स्वतःला संकुचीत करतात. अरविंदरावांनी मात्र अनेकविध क्षेत्रात योगदान देत स्वतःला विशिष्ठ चौकटीतून बाहेर काढले आहे. त्यांनी आमदारकीच्या कार्यकाळात तालुक्यात नव्या विकासपर्वाची सुरूवात केली. तालुक्याच्या विकासासाठी अशा नेत्यांला वाढदिनानिमित्त शुभेच्छा देतांना ते आणखी चिरतरूण होवो, हीच सदिच्छा!
अष्टपैलू नेता
लोकप्रतिनिधी होणे ही मोठी प्रक्रिया असते. त्यासाठी अखंड मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी संयमाचा आणि सहनशीलतेचा कस लागत असतो. अनेकांना सांभाळून घ्यावे लागत असते. अरविंद पाटील यांच्या आमदार होण्यापूर्वीचा कालखंड ज्यांना आठवत असेल, त्यांना याची कल्पना येईल. तालुक्याच्या पूर्व भागापासून इकडे गोवा आणि सिंधुदुर्गला भिडलेल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचणे, तेथील तरुणांना आपल्या बाजूने वळवणे, ही सोपे काम नाही. पण अखंड, अविश्रांत मेहनत घेवून त्यांनी ते साध्य केले. मशागत महत्त्वाची. त्यामुळे दबावगट तयार होतो.
शहरी भागात एक बरे असते. निवडून आल्यावर कार्यकर्त्यांचा फारसा त्रास नसतो. ग्रामीण भागात मात्र नेतृत्त्वाला दुसऱ्या फळीची काळजी घ्यावी लागते. दुसऱ्या फळीतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विविध सत्तास्थाने मिळवून द्यावी लागतात. संघटनेत मतभेद निर्माण होवू नयेत यासाठी दक्ष रहावे लागते. आपण निवडलेले प्रतिनिधी विकासाचा गाडा व्यवस्थित हाकतील, याची काळजी घ्यावी लागते. अरविंद पाटील यांनी जे लोक निवडले, ते अरविंद पाटील यांच्याबरोबरच सामान्य मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरले आहेत, असे निश्चितपणाने म्हणता येईल. अलिकडे मात्र ते होतांना दिसत नाही. त्यामुळे जनता पुन्हा एकदा अरविंद पाटील यांच्याकडे अपेक्षेने पाहत आहे.
सर्वात महत्त्वाचा आहे तो आक्रमक स्वभाव. मतदारांच्या हितासाठी झटले पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होत असेल तर प्रसंगी रस्त्यावर उतरले पाहिजे. सामान्य माणसाला आवाज नसतो. त्यासाठी लोकप्रतिनिधी नावाची व्यवस्था निर्माण केली आहे. पण अलिकडे लोकप्रतिनिधी शांत राहण्यावरच भर देताना दिसतात. अरविंद पाटील तसे नाहीत. लोकांसाठी ते किती आक्रमक होवू शकतात, ते नरभक्षक वाघाच्या निमित्ताने दिसून आले होते. तिथल्या लोकांसाठी ते पोलिस प्रशासनाशी भिडले. त्यांचा रुद्रावतार पाहून पोलिसांची भंबेरी उडाली होती. अरविंद पाटील नसते, तर मुडगईप्रमाणे आणखी किती बळी पडले असते कुणास ठाउक? त्यादिवशी जर प्रकाश हुक्केरी तिथे नसते तर मोठा अनर्थ उद्भवला असता. खानापूरच्या सध्याच्या राजकारणात अशी आग्रही आणि आक्रमक भूमिका केवळ अरविंद पाटीलच घेवू शकतात. यात कुणाच्याही मनात शंका असण्याचे काहीही कारण नाही.
आता राहिले राजकारण. राजकारणात नेत्याचा चौफेर असावे लागते. सहकार हे राजकारणाचे महत्त्वाचे अंग. सहकारानेच देशात समृद्धी आणली हे सत्य आहे. जिल्हा बँक हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा खऱ्या अर्थाने कणा. विविध स्थानिक सहकारी संस्थाना जिल्हा बँकेकडून पतपुरवठा केला जातो. या मध्यवर्ती संस्थेवर जाणे सर्वात महत्त्वाचे. याचे कारण सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. कर्नाटकी नेत्यांची भाऊगर्दी, त्यांच्यातले गटतट, त्यांचे वर्चस्व असूनही हा बंदा रुपया मानाने सहकाराचे राजकारण करतो, तेही तितकेच महत्त्वाचे. राजकारणात आपली पक्षीय आणि संघटनात्मक भूमिका जपताना पक्षातीत मैत्री करावी लागते. विविध नेत्यांशी सौहार्दाचे संबंध निर्माण करावे लागत असतात. राजकारण बटबटीत आणि हिंस्त्र असून चालत नाही. ते मैत्रीपूर्ण आणि खिलाडूवृत्तीचे असले पाहिजे. त्यामुळेच समाजाच्या निकोप विकासाची प्रक्रिया होत असते. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसमवेत त्यांचे जिव्हाळयाचे संबंध आहेत. अरविंद पाटील यांच्या मित्रयादीतील नेते पाहिले तर त्याची कल्पना येते. माननिय माजी सहकार मंत्री लक्ष्मण सवदी, खा. प्रकाश हुक्केरी, मुख्यमंत्री सिध्दरामय्या ते माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्यापासून ते भाजप आणि काँग्रेसच्या बलाढ्य नेत्यांशी त्यांचे निकटचे आणि तितकेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत व हीच त्यांच्या मुत्सद्देगिरीची व राजकीय कौशल्याची पावती आहे.
आपल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, सहकारी संस्था यातील विकासकामे कशी सुरु आहेत, याचा ते बारकाईने अभ्यास करतात. त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करतानाही तालुक्यात काय वेगळे करता येईल, त्याचा सामान्यांना कसा लाभ होईल, यावरच भर असतो. विकासकामांच्या ठिकाणी ठामपणाने उभे राहण्याचा, कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याचा, चुकीच्या कृत्याबद्दल त्यांना दटावण्याचा त्यांचा गुण अनुकरणीय आहे. खानापूरसारख्या दुर्गम, वैविध्यपूर्ण, कलासक्त, निसर्गाने भरभरुन दिलेल्या तालुक्यातील नागरिकांचा अरविंद पाटील हा भक्कम आणि खमका आधार आहे. विकासासाठी वाऱ्यासारखा भिरभिरणारा, संकटात कार्यकर्त्याच्या पाठिशी पहाडासारखा उभा राहणारा, अडीअडचणीला धावून जाणारा, विकासाबरोबरच क्रीडा आणि कलागुणांना प्रोत्साहन देणारा, प्रशासनाच्या निगरगट्टपणाला दणकून जाब विचारणारा हा विरळा नेता आहे. खानापूरसारख्या तालुक्याला अशा ठाम आणि धडाडीच्या नेतृत्त्वाची गरज आहे. या खमक्या आधाराकडेच तालुक्याच्या विकासाची खरी किल्ली आहे.

खानापुरातील कवळे मठाच्या जमिनीवर अतिक्रमण; ‘भायल्यां’ची दादागिरी
समांतर क्रांती / खानापूर येथील प्राचिन कवळे मठाच्या जमिनीवर हुबळी येथील कांहींनी अतिक्रमण केले आहे. दादागिरी करीत त्यांनी जमिनीतील एका अस्थापनात ठाण मांडले आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने कवळे मठाच्या देशभरातील भक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे, अशी माहिती मठाचे मठाधिश शिवानंद सरस्वती स्वामिजींनी दिली. मठाच्या सभागृहात ते पत्रकारांशी बोलत होते. Encroachment on […]