
समांतर क्रांती / खानापूर
बेळगाव – पणजी महामार्ग आणि चोर्ला राज्य महामार्गावरून वाहतूक करणे, वाहन चालकांच्या जीवावर बेतत आहे. अनमोड घाटात दरड कोसळून महामार्ग खचला आहे, तर चोर्ला रस्त्यावर जांबोटीनजीक कुसमळी पुलाचे काम अर्धवट आहे. दोन्ही रस्त्यावरील वाहतूक धोक्याची बनली असतांना अवजड वाहन चालकांनी आक्रस्ताळेपणा चालविला आहे. याकडे महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ दुर्लक्ष चालविले असून मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अवजड वाहतूक बंदीला चिरीमिरीचा उतारा..
अनमोड घाटात एका वळणावर दरड कोसळून महामार्ग खचला आहे. त्यामुळे ६० दिवस या मार्गावरून अवजड वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले होते. पण, रामनगर ते कारवार आणि पुढे गोवा असा लांब पल्ल्याचा प्रवास टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी अनेक वाहणे अनमोड घाटातून हाकली जात आहेत. अनमोड येथे तपासणी नाके आहेत. तेथे खुद्द पोलिसांकडूनच चिरीमिरी घेऊन वाहने सोडली जात असल्याचा आरोप होत आहे. एकंदरच, चालकांच्या परिस्थितीचा अशाप्रकारे फायदा उठविण्यात पोलिसांना यश आले आहे.
घाटातील संततधारेमुळे खचलेल्या महामार्गाच्या दुरूस्तीचे काम कुर्मगतीने सुरू आहे. अशातच अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे समस्येत आणखी भर पडत आहे. महामार्गाचा आणखी कांही भाग दरीत कोसळण्याची शक्यता तर आहे. अवजड वाहनांच्या ‘चोरट्या’ वाहतुकीवर सुध्दा बंदी घालण्याची गरज आहे, अन्यथा ऐन सणासुदीच्या काळात रस्ता पूर्णत: बंद होऊन प्रवाशांचे नाहक हाल होणार आहेत.

कुसमळी पुलावर ‘अती घाई..’
चोर्ला महामार्गावरील जांबोटीनजीकच्या कुसमळी पुलाच्या उद्घाटनाची घाई सरकारने केली. महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी पुलाचे उद्घाटन करून वाहतुकीस पूल मोकळा करून दिला. पण, सुरूवातीला असलेली बंदी डावलून आता आठवडाभरापासून अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आज शुक्रवारी (ता. २६) सकाळी एक अवजड ट्र अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावर अडकला. त्यामुळे शेकडो वाहने अडकून पडल्याची घटना घडली. अवजड वाहतूक वेळीच बंद न केल्यास पुलाला सुध्दा धोका निर्माण होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
कांही काळ अवजड वाहतूक खानापूर-जांबोटी मार्गे वळविण्यात आली होती. पण, हा रस्ता एकतर अरुंद आहे, त्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली. परिणामी, वाहनचालकांचे हाल कांही संपेनासे झाले. त्यासाठी घाई करीत कुसमळी पूल वाहतूकीस खुला करण्यात आला असला तरी या पुलावरील वाहतूक धोक्याची आहे. महामार्गावरील वाहतुकीचे अशाप्रकारे तीनतेरा वाजले आहेत. विशेष म्हणजे महामार्गावरील वाहतूक संपर्क रस्त्यांनी वळविल्याने तालुक्यातील अनेक संपर्क रस्त्यांची देखील चाळण झाली आहे.


वाळू माफियांना सलाम, स्थानिकांना लगाम: वनखात्याचा अजब कारभार
समांतर क्रांती / खानापूर सावरगाळी येथील स्थानिकांना वनक्षेत्रात प्रवेश करण्यास सुध्दा मज्जाव करणाऱ्या वनखात्याकडून वाळू माफीयांना मात्र हटकण्याचीही तसदी घ्यायला तयार नाही. त्यामुळे वाळू माफीया आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचेच स्पष्ट होत आहे. दरम्यान, वाळू माफीयांनी मात्र वाळू उपशाच्या माध्यमातून राजरोसपणे जंगल संपतीची नासधूस चालविली आहे. सावरगाळी येथील जंगलाच्या बाजुने असलेल्या शेतवडीत एका वाळू […]