समांतर क्रांती / खानापूर
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची रंगीत तालिम आज चिक्कहट्टीहोळी येथे दिसून आली. काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला विरोधकांनी पळविल्याचा प्रकार घडला असून निवडणूक भयमुक्त होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सत्तेच्या आडून दडपशाही चालविली जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्याच विधान परिषदेतील आमदारांच्या समर्थकांनी उमेदवार पळविण्याचा प्रकार घडला असल्याने याची जोरदार चर्चा खानापूर तालुक्यात सुरू आहे.
चिक्कहट्टीहोळ्ळी येथील कृषी पत्तीन संघाच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होत आहे. या जागेसाठी काल आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज काँग्रेसपुरस्कृत उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते संघाच्या कार्यालयात आले असता तेथे आधीच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कांहींनी संभाव्य उमेदवाराला वाहनातून उतरवून त्याला पळविले. यावेळी ज्या वाहनातून त्या संभाव्य उमेदवाराला पळविण्यात आले, त्याचा पाठलाग केला जाऊ नये यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या मागे ट्रॅक्टर तर समोर मोठा जमाव थांबविण्यात आला होता.
अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर सदर संभाव्य उमेदवाराचे मत व्हीडीओद्वारे व्हायरल करण्यात आले आहे. त्या उमेदवाराने ‘गावपंचांनी पुढील वेळी तुला संधी दिली जाईल. यावेळी निवडणुकीत उबा राहू नको’, अशी विनंती केल्याचे म्हटले आहे. याबाबत बोलतांना काँग्रेसचे सुरेश जाधव यांनी जर त्यांनी खरच पंचांच्या सांगण्यावरून माघार घेतली असेल तर ते आमच्यासमवेत का आले होते? गावपंचांनी आधीच त्यांना निवडडणुकीपासून परावृत्त का केले नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सदर उमेदवाराला अमिष दाखवून किंवा दमदाटी करून माघार घेतल्याची प्रतिक्रिया वदवून घेतल्याचे व्हीडीओच्या चित्रीकरणातून दिसून येत आहे. त्यामुळे आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांनी आपली बिनविरोध निवड करून घेण्यासाठीच पळवापळवीचा प्रकार घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे.
हा प्रकार घडला त्यावेळी सुरेश जाधव यांच्यासमवेत युवा काँग्रेसचे अध्यक्ष साईश सुतार, दीपक कवठणकर, पांडू पाटील, भरतेश तोरोजी आदींनी विरोधकांना तगडा प्रतिवाद केला. डॉ.
अंजली निंबाळकर यांची कुणाशीही युती नाही
आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी हेदेखील काँग्रेसचेच असतांना त्यांच्याविरोधात उमेदवार का दिला जात होता? अशी विचारणा काँग्रेसचे सुरेश जाधव यांच्याकडे केली असता त्यांनी याबाबत सविस्तर खुलासा केला. आमदार हट्टीहोळ्ळी हे काँग्रेसचे असले तरी त्यांनी कधीच आमच्याशी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसंदर्भात संपर्क साधलेला नाही. आम्ही आमच्या नेत्या डॉ. अंजली निंबाळकर यांच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या निवडणुकीत रात्रंदिवस प्रयत्न केल्यामुळे त्यांना खानापूर तालुक्यातून सर्वाधिक मते मिळाली होती. पण, आमच्या नेत्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत आमदार हट्टीहोळ्ळी यांच्या गावातून काँग्रेसला किती मते मिळाली?
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी, राज्यात मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे संविधान बचावचा नारा देऊन लोकशाही वाचविण्यासाठी झटत असतांना आजचा जो प्रकार घडला त्याला काय म्हणावे. ही वर्तणूक पक्षशिस्तीला धरून आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉ. अंजली निंबाळकर यांनी अद्याप जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्या पक्षकार्यात व्यस्त असल्याने त्यांची कार्यकर्त्यांशीही याबाबत चर्चा झालेली नाही. पण, त्या खानापूरात आल्यानंतर पक्षनेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपला निर्णय जाहीर करती, असेही सुरेश जाधव यांनी नमूद केले.
एकंदरच, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तयारी करीत असलेल्यांना प्राथमिक कृषी पत्तीन संघाच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची धमक नसल्याचेच आजच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या काळात असे आमिषे दाखविण्याचे, धमकावण्याचे प्रकार घडत राहतील, पण तालुक्यातील सुज्ञ जनता त्यांना त्याच भाषेत उत्तर देईल, असेही श्री. जाधव यांनी म्हटले आहे.

जांबोटी रस्त्यावर जीवघेणा खड्डा
समांतर क्रांती / खानापूर रस्त्यावरचे खड्डे हा काही नवा विषय नाही. याबाबतीत अख्खा खानापूर तालुका ‘खड्ड्यात’ गेला आहे. खानापूर – जांबोटी रस्त्यावर रामगुरवाडी जवळ मधोमध भलामोठा खड्डा पडला आहे. यामुळे अपघाताना निमंत्रण मिळत असून याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याबद्दल लाखोल्या वाहिल्या जात आहेत. रामगुरवाडी क्रॉसपासून जवळ एका वळणावर हा खड्डा पडला असून त्यात पाणी […]