
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
बेळगावचे गोव्याशी असलेले व्यापारी संबंधात आर्थिक सेतू असलेल्या चोर्ला महामार्गाच्या समस्यांचे दशावतार संपणार तरी कधी? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. दरड कोसळल्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, वळणांमुळे होणारे अपघात, नादुरूस्त रस्त्यामुळे वाहतुकीवर होणारे परिणाम हे नित्त्याचेच बनले आहेत. त्यात यंदा कुसमळी पुलामुळे प्रवाशी आणि वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. काल रविवारी (ता. ३१) दोन वाहने रस्त्यावर अडकल्याने आज सोमवारी (ता.१) कालमणीनजीक चक्काजाम झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास किती जिकीरीचा बनला आहे, याची प्रचितीच यानिमित्ताने येत आहे.
गेल्या वर्षभरापासून चोर्ला महामार्गावरील कुसमळी पुलाचे बांधकाम सुरू आहे. ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. तरीही धोका पत्करून वाहतूक सुरू करण्यात आली. पावसाळ्यात दोन महिने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. केवळ प्रवाशी वाहनांना प्रवेश देण्यात आला असतांना मुसळधार पावसामुळे चोर्ला घाटात दरडी कोसळण्याच्या घटनांनी प्रवाशी बेहाल झाले. हे कमी म्हणून की काय? दोनच महिन्यांपूर्वी डागडुजी करण्यात आलेल्या महामार्गाची चाळण झाली. काल-परवाच त्याची पुन्हा डागडुजी करण्यात आली आहे.

सदर रस्त्यावर अनेक अपघाप्रवण वळणे आहेत, त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. गेल्या सहा महिन्यात जांबोटी ते चोर्लादरम्यान आठ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो प्रवाशी जायबंदी झाले आहेत. उचवडे फाटा ते चोर्लापर्यंतच्या रस्त्याच्या विकासासाठी ५८ कोटींचा निधी मंजूर असला तरी महामार्ग विकास मंडळ रस्त्याचा विकास साधण्यात ‘नालायक’ ठरले आहे. याच निधीतून दुरूस्त करण्यात आलेला कणकुंबी ते चोर्लापर्यंतचा रस्ता अवघ्या दोन महिन्यात वाहून गेल्याने विकास मंडळाचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हा पालकमंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांनी चोर्ला रस्त्याच्या डागडुजीतील ‘डांबरट’ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिल्याने पुन्हा रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. एकंदर, रस्ता विकासाचा निधी वारंवार पाण्यात घालून प्रवाशांच्या जिवाशी खेळ मांडला जात असल्याचा आरोप होत आहे.


खानापुरातील तहसील कार्यालयात नव्हे, तर ‘या’ कार्यालयातून सुरू झाली गणेशोत्सवाची परंपरा..
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर आजघडीला सर्रास शासकीय कार्यालयात गणेशोत्सव साजरा केला जातो. खानापूरात सुध्दा पूर्वीपासून शासकीय कार्यालयात गणेशोत्सव साजरा केला जातोय. पण, तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसीलदार कार्यालयातून या परंपरेला सुरूवात झाली नाही. तर कोणत्या कार्यालयात आधी बाप्पांचे आगमन झाले? शहरातल्या तहसील, हेस्कॉम, सार्वजनीक बांधकाम खाते, बस आणि पोलिस स्थानकासह नगर पंचायतीच्या कार्यालयात गणेशोत्सव साजरा […]