
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
खानापूर तालुक्यात भ्रष्टाचाराने कळस केला आहे. लोकप्रतिनिधी, त्यांचे दलाल कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना लुबाडण्याचा ‘धंदा’च सुरू केला आहे. जनतेने सुध्दा हतबल होऊन शिष्टाचार म्हणून स्विकारल्यामुळे त्यांची लूट केली जाते, याबाबत त्यांना कांहीच वाटत नाही. गेल्या महिनाभरातील प्रकरणांवर नजर टाकल्यास भ्रष्टाचाराने कोणती पातळी गाठली आहे, याची प्रचिती येते.
घटना १ : शहरांतर्गत महामार्ग
करंबळ क्रॉस ते राजा टाईल्स्पर्यंतच्या शहरांतर्गत महामार्गाच्या १४ कोटींच्या ‘वन टाईम डेव्हलपमेंट’च्या कामाला सुरूवात झाली. काँग्रेस आणि म.ए.समिती नेत्यांनी रस्ता कामात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. त्याची चौकशी करण्याऐवजी आमदार विठ्ठल हलगेकर आणि त्यांच्या पक्षाचे नेते प्रमोद कोचेरी यांनी चक्क कंत्राटदाराची तळी उचलली. काम आराखड्याप्रमाणेच होत असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी कोणतीही शहानिशा न करता देऊन टाकले.
प्रत्यक्षात कामाचा दर्जा घसरला आहे, हे शेंबडं पोरसुध्दा सांगू शकतं, अशी असतांना आमदार आणि भाजप नेत्यांनी कंत्राटदाराची तळी का उचलली? या प्रश्नाचे गुपित मात्र विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांना आणि म. ए. समितीच्या कार्याध्यक्षांना समजलेले दिसत नाही. जुन्या डांबरी रस्त्यावर न उकरता डांबरीकरण केले जात आहे. ही बाब गंभीर असली तरी त्याचे गांभिर्य मात्र कुणालाच नाही. सदर कंत्राटदार हा काँग्रेसच्या एका मंत्र्यांचा आप्तस्वकीय असल्याची माहिती जगजाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनीही शेपूट घातली.
घटना २ : चक्क आमदारांचा पी.ए. लाच मागतो?
मागच्या आठवड्यात शिरोली पंचायतीचे सदस्य कृष्णा गुरव व दीपक गवाळकर यांच्याकडे २२ लखांचे २५ टक्के कमिशन मागतानाचा ओडिओ व्हायरल झाला होता. २२ लाखांचे २५ टक्के कमिशन म्हणजे तब्बल ५.५० लाखांची लाच त्यांनी मागितल्याचा आरोप झाल्यानंतर आमदारांनी त्यांना स्वीय सहायक पदावून पायउतार करण्याची मागणी केली. पण, ‘हौदसे गयी ओ बुंदसे’ कशी येणार? म्हणून त्यांनी आपल्या नावाचा वापर करून सरकारदरबारी मोठ्या रक्कमेचा निधी लाटला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपात तथ्यही असू शकते. कारण, त्यांना अंधारात ठेवून कांहीजण बंगळूरात काळाबाजार करीत आहेत.
घटना ३ : गावांच्या स्थलांतरात गैरव्यवहार
भीमगड अभयारण्यातील १३ गावांच्या प्रस्तावित स्थलांतरात आतापासूनच गैरव्यवहार सुरू झाला आहे. तळेवाडी-गवळीवाड्यावरील ३२ कुटुंबांच्या स्थलांतर प्रक्रीयेत जिल्हा वनाधिकारी मारिया ख्रिस्तू डी. राजा, खानापूरच्या उपवनसंरक्षक सुनिता निंबरगी, भीमगडचे वनक्षेत्रपाल सय्यद नदाफ, महसूल विभाग आणि नेरसा पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने गैरव्यवहार केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी व्ही. एम. प्रमोद यांनी केला आहे. तशी तक्रार सुध्दा त्यांनी केंद्रीय पर्यावर आणि वन मंत्रालयाकडे केली आहे. एकंदर काय तर ‘गाव बसा नही, लेुरे आ गये लुटने’ हेच यावरून दिसते.
या कांही प्रातिनिधीक घटना असल्या तरी तालुक्यातील शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही त्यांच्या शिर्ष नेत्यांना अंधारात ठेवून अधिकाऱ्यांना लुटत आहेत. तर अधिकाऱ्याची झालेल्या लुटीची भरपाई करण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना लुटत आहेत. विशेष म्हणजे यात दलाली करणारे दलालांना सुध्दा अच्छा दिन आले आहेत. आम्ही सगळे भाऊ – भाऊ म्हणत ‘कायदेशीर दरोड्यां’चा हा धंदा बिनबोभाट सुरू आहे. जिकडे-तिकडे आनंदी गडे, समाजसेवक गेले कुणीकडे? असा प्रश्न घायकुतीला आलेली जनता विचारत आहे.


राजकारणापेक्षा समाजकार्याला वाहून घेणारा कार्यकर्ता : प्रसाद पाटील
समांतर क्रांती / व्यक्तिविशेष चेतन लक्केबैलकर कार्यकर्ता ही जमात आताश: लोप पावत चालली आहे. आता गल्लीबोळातून गावगन्ना पुढाऱ्यांचे पेव फुटले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आपला पुढारी म्हणून कुणाचा झेंडा हाती घ्यावा, हा डोंगराएवढा प्रश्न पडला असतांना प्रसाद पाटील यांच्या सारखा सामान्य कार्यकर्ता ‘आधारवड’ बनून समोर येतो. समाजातल्या रांजल्या-गांजल्या जनतेला हा त्याचा आधार लढण्याचे बळ देतो. गर्लगुंजी […]