पणजी : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या अमली पदार्थांच्या साम्राज्यावर अखेर मोठा घाव बसला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने रविवारी मध्यरात्री गोव्यात गुप्त कारवाई करत दाऊदचा विश्वासू साथीदार आणि मुंबईतील ड्रग्ज नेटवर्कचा किंगपिन दानिश चिकना याला जेरबंद केले.गेल्या काही वर्षांपासून त्याने गोव्यासह कर्नाटकात देखील ड्रगचे साम्राज्य विस्तारले होते.
अर्पोरा (हडफडे) परिसरात राबवलेल्या या कारवाईदरम्यान दानिशसोबत एक महिला असल्याने स्थानिक हणजुण पोलीस ठाण्याच्या महिला पथकाची मदत घेण्यात आली होती.
मुंबईपासून गोवापर्यंत पसरलेलं ‘ड्रग्ज साम्राज्य’
दानिश मर्चंट उर्फ फँटम हा दाऊदच्या ‘डी कंपनी’तील महत्त्वाचा घटक मानला जातो. मुंबईतील डोंगरी भागात दाऊदसाठी चालवली जाणारी ड्रग्ज फॅक्टरी तो स्वतः पाहत असे, असा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. उत्पादनापासून वितरणापर्यंत संपूर्ण नेटवर्क त्याच्या हातात असल्याचं समोर आलं आहे.
एकेकाळी जामिनावर सुटलेला दानिश पुन्हा नवं गुप्त नेटवर्क तयार करून एमडी (Mephedrone) ड्रग्जचा व्यापार चालवत होता. मात्र एनसीबीच्या ‘रडार’वरून तो सुटू शकला नाही.
पोलिसांच्या रडारवर जुना खेळाडू
ही दानिशची पहिली अटक नाही. २०२४ मध्येही त्याला मुंबई पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात पकडलं होतं. याआधी २०११ मध्ये राजस्थानमधून त्याला दाऊदशी संबंधित ड्रग्ज फॅक्टरी ऑपरेशनसाठी मुंबईत आणण्यात आलं होतं.
गेल्या वर्षी झालेल्या अटकेत १९९ ग्रॅम अमली पदार्थ जप्त झाले होते, आणि त्या मागचा सूत्रधार दानिशच असल्याचं समोर आलं होतं.
डी कंपनीच्या ड्रग्ज साम्राज्यावर दुहेरी घाव
दरम्यान, मुंबई क्राईम ब्रँचनंही दाऊदच्या नेटवर्कवर ₹२५६ कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत मोठं यश मिळवलं आहे. दुबईतून प्रत्यार्पित झालेल्या सलीम डोलाचा निकटवर्ती मोहम्मद सलीम सुहेल शेख याला अटक करण्यात आली आहे.
सांगलीत उघड झालेल्या गुप्त मेफेड्रोन (MD) फॅक्टरीतून तब्बल १२२.५ किलो एमडी (बाजारमूल्य ₹२४५ कोटी) जप्त करण्यात आलं. आतापर्यंत या ऑपरेशनमध्ये १५ जणांना अटक, तसेच १२६ किलो ड्रग्ज आणि ₹४.१९ कोटी रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.
पुढील तपासासाठी मुंबईकडे
एनसीबी आणि क्राईम ब्रँचच्या संयुक्त कारवाईमुळे दाऊदच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा मोठा भंडाफोड होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. दानिश चिकनाला म्हापसा न्यायालयात हजर करून ट्रांझिट रिमांड मिळाल्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला मुंबईला नेण्यात आले आहे.

खानापूर तालुक्यातील 'या' गावात उद्या वीज नाही
समांतर क्रांती / खानापूर हेस्कॉमकडून देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवारी (दि. ३१) खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये दुपारी १ ते ५ यावेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. खानापूर वीज केंद्रात अचानक दुरुस्तीचे काम निघाल्यामुळे खानापूर शहरासह लैला शुगर्स, देवलत्ती, बिदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, भंडरगाळी निडगल, दोड्डहोसुर, सन्नहोसूर, करंबळ, जळगा, कुप्पटगिरी, लोकोळी, लक्केबैल, […]