
समांतर क्रांती / खानापूर
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण, खात्यावर रक्कम असतांनादेखील संबंधीतांनी डिमांड ड्राफ्ट देण्यास नकार दिल्याने पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात तालुका काँग्रेसच्या नेत्यांनी उडी घेतली असून नागरिक आणि कृषी पत्तीन संस्थांनी त्यांच्या ठेवी सुरक्षित असल्याबद्दल खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. त्याशिवाय विद्यमान संचालकांचा बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याबद्दल ताशेरे ओढले आहेत. आगामी निवडणुकीत हा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हलकर्णी (ता.खानापूर) येथील कृषी पत्तीन सहकारी संघाचे सदस्यत्व करून घेण्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खानापूर शाखेने निरूत्साह दाखविला. सदर संस्थेच्या बँक खात्यात रु. २ लाख ७७ हजारांची रक्कम असतांनाही अध्यक्ष आणि सेक्रेटरींना चुकीची माहिती देऊन त्यांना सदस्यत्वापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न व्यवस्थापक बसवराज केरूर आणि सहाय्यक व्यवस्थापक सुरेश कांबळे यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्हा सहकार निबंधकांनी हलकर्णी कृषी पत्तीनला जिल्हा मध्यवर्ती बँकेत सदस्यत्व देण्याचा आदेश देऊन जोर का झटका दिला होता.
त्यानंतर हलकर्णी कृषी पत्तीनचे अध्यक्ष सुरेश दंडगल यांनी संबंधीतांवर फौजदारी गुन्हा दाखल करून डीसीसी बँकेच्या खानापूर शाखेत कांहीच अलबेल नसून गैरव्यवहार होत असल्याची शंका व्यक्त केली आहे. एकंदर, या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे. काँग्रेसकडून विद्यमान संचालकांवर आरोपाच्या फैरी झाडल्या जात असून बँकेत सर्वसामान्यांच्या ठेवी आणि कृषी पत्तीन संघांचे सुरक्षित नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक तोंडावर असतांनाच हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे यामागे राजकारण असल्याचे स्पष्टीकरण देण्याचे धाडस मात्र संबंधीत विद्यमान संचालक आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखविलेले नाही. परिणामी, खरंच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खानापूर शाखेत गैरव्यवहार चालला आहे का? तो कुणाच्या आशिर्वादाने चालला आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवाय याबाबत खुलासा केला जात नसल्याने बँकेच्या व्यवहाराबाबत संशयाचे ढग गडद होत आहेत. व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापकांना अटक झाल्यानंतरच या प्रकरणाचा पर्दाफाश होणार आहे. तुर्तास पोलिसांनीही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले आहे. आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. कारण, दोन्ही ब्लॉकच्या अध्यक्षांनी याबाबत तोंडात मिठाची गुळणी धरली आहे.

‘डीसीसी’च्या निमित्ताने ‘मदाऱ्यांचा खेळ’
समांतर क्रांती / विशेष मान्सूनपूर्व आवकाळी पावसाने तालुकावासीयांच्या तोंडचे पाणी पळविले. मध्यंतरी, चार दिवस पावसाने उसंत दिल्यानंतर मशागतीला वेग येईपर्यंत मान्सून थडकला. परिणामी, खानापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास दुबार पेरणीचे संकट टांगत्या तलवारीसारखे मानगुटीवर आहे. रस्त्यांची चाळण झाल्याने प्रवाशी त्रस्त आहेत. शासकीय कार्यालयातील बोकाळलेल्या भ्रष्टाचारांने सर्वसामान्यांची दैना केली आहे. अशातच आता […]