समांतर क्रांती / विशेष
मान्सूनपूर्व आवकाळी पावसाने तालुकावासीयांच्या तोंडचे पाणी पळविले. मध्यंतरी, चार दिवस पावसाने उसंत दिल्यानंतर मशागतीला वेग येईपर्यंत मान्सून थडकला. परिणामी, खानापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास दुबार पेरणीचे संकट टांगत्या तलवारीसारखे मानगुटीवर आहे. रस्त्यांची चाळण झाल्याने प्रवाशी त्रस्त आहेत. शासकीय कार्यालयातील बोकाळलेल्या भ्रष्टाचारांने सर्वसामान्यांची दैना केली आहे. अशातच आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण्यांचा मदाऱ्याचा खेळ सुरू झाला आहे.
काल बुधवारी (ता.१८) अरभावीचे भाजप आमदार भालचंद्र जारकीहोळ्ळी यांनी काळाची पावले ओळखून विद्यमान संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनाच पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन तालुक्यातील कृषी पत्तीन संघांच्या कारभाऱ्यांना केले आहे. त्यांना बिनविरोध निवडून द्या अशी विनंती करतांनाच त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना जारकीहोळ्ळी बंधू एकत्र येऊ, असा इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत. त्यांचा हा इशारा नेमका कुणाला होता? त्यांनी पत्रकारांशी बोलतांना आमदार विठ्ठल हलगेकर यांचा नामोल्लेख केला. पण, त्यांचा इशारा केवळ आमदार हलगेकरांना नव्हता, हे मात्र नक्की.
आमदार भालचंद्र जारकीहोळ्ळी यांनी कुणा-कुणाचे कान टोचले हे समजून घेण्यासाठी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या मोर्चेबांधणी आणि घोडेबाझार नजरेखालून घालणे आवश्यक आहे. गेल्या वर्षभरापासून अरविंद पाटील हटावसाठी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी कुरघोड्या सुरू केल्या होत्या. ‘भरमाणी पाटील प्रकरणा’नंतर झारीतला शुक्राचार्य कोण? याची शहानिशा माजी आमदार अरविंद पाटील यांच्या समर्थकांना झाली. भाजपविरूध्द भाजप अशी लढत जवळपास अटळ होऊन बसली असतांना आ.हलगेकर आणि माजी आ. अरविंद पाटील यांच्यात अनेक घटनांत रुसवेफुगवे आणि द्वेषाची दरी वाढत गेली. भाजपात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन गट पडले.
भाजपमधील सुंदोपसुंदी टोकाला पहचत असतांनाच विधान परिषदेतील आमदार आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळ्ळी यांनी मैदनात उडी घेतल्याने निवडणुकीची समिकरणे एका रात्रीत बदलली. खानापूर तालुक्यात चंचूप्रवेश करून मृनाल हेब्बाळकर यांना आमदारकीचे तिकीट मिळविणे अशी ही योजना असल्याची चर्चा सुरू झाली. भेटीगाठी आणि बैठकांना सुरूवात झाल्यानंतर काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर गटातील नेत्यांची बोबडी वळली. कारण, मागच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना माजी आमदार अरविंद पाटलांनी मात दिली होती. त्याची भरपाई करण्यासाठी डॉ. निंबाळकर तयारीत असतांनाच चित्र एकदम पालटले.
मजेची गोष्ट म्हणजे भाजप आमदार हलगेकर आणि त्यांच्या कंपुचा जेवढा विरोध विद्यमान संचालकांना आहे, त्याहून गुंजभर अधिक विरोध हा डॉ. निंबाळकरांचाही आहे. पक्षीय प्रतिस्पर्धी म्हणून डॉ. निंबाळकरांच्या विरोधाकडे कानाडोळा करता आला असता, पण आ.हलगेकरांच्या विरोधाला काय म्हणावे? असा प्रश्न माजी आमदार पाटलांच्या समर्थकांना सतावत असतांनाच आ.हलगेकर हे विधानससभेतील मदतीची उतराई करण्यासाठी मंत्री हेब्बाळकर यांच्याशी संधान साधणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. तर दुसरीकडे तालुक्यात येणारे ‘वादळ’ थोपविण्यासाठी हलगेकर आणि निंबाळकर यांच्यात युती होणार, असेदेखील चर्वितचर्वण सुरू झाले.
मंत्री हब्बाळकरांचा चंचूप्रवेश कुणालाच परवडणारा नाही. ना हलगेकरांना, ना निंबाळकरांना, ना अरविंद पाटलांना. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे पत्ते पिसले जाणार आहेत. मंत्री हेब्बाळकर यांनी आ.हट्टीहोळ्ळींच्या माध्यमातून चंचूप्रवेश केल्यास सर्वात आधी डॉ. निंबाळकरांचे संभाव्य तिकीट कापले जाईल. मंत्री हेब्बाळकर यांनी एन्ट्री घेतल्यास त्या थेट हलगेकरांना धक्का देतील, त्या हलगेकरांच्या राजकीय कारकिर्दीला आव्हान देतील. राहिला प्रश्न अरविंद पाटील यांचा तर हलगेकरांहून वेगळी आवस्था त्यांचीही नसेल.
थोडक्यात, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या सर्वांनाच धोक्याच्या आहेत. परिणामी, ऐका सावध पुढल्या हाका, असे म्हणत सावध पावले टाकण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. इथे तालुक्यातील जनता ना. हेब्बाळकरांना तालुक्यातील जनता स्विकारेला का? हा प्रश्न आहेच. पण, अलिकडच्या ‘पैशांचा पाऊस’ पाडणाऱ्या निवडणुका पाहिल्या की, खानापूर तालुका काबिज करण्यास ना. हेब्बाळकरांना वेळ लागणार नाही. अर्थातच, मतदारांच्या जिभेला मधाचे बोट येथील राजकारण्यांनीच लावले आहे. साहजिकच ना.हेब्बाळकरांवर मतदारांनी वरदहस्त ठेवल्यास नवल ते काय?
आता मुद्दा येतो तो, आ. जारकीहोळ्ळी यांनी दिलेल्या दम वजा इशाऱ्याचा. जारकीहोळ्ळी बंधूंना ना. हेब्बाळकरांचे साम्राज्य खालसा करायचे आहे, हे ‘ओपन सिक्रेट’ आहे. त्या अनुषंघाने खानापूर तालुक्यात त्यांना प्रवेशच करू द्यायचा नाही, याचा खटाटोप जारकीहोळ्ळी बंधू करणार, यात कांहीच आश्चर्य नाही. पक्ष पातळीवर सतिश जारकीहोळ्ळी डॉ. निंबाळकरांना गप्प करू शकतात. आमदार रमेश जारकीहोळ्ळी आ.हलगेकरांना अडवू शकतात. तर स्वत: आ.भालचंद्र जारकीहोळ्ळी माजी आमदार अरविंद पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू शकतात. एकुणच अरविंद पाटील यांनी योग्यवेळी योग्य फासे टाकल्याने त्यांच्या विजयाची वाट सुकर झाली आहे.
तरीही, डॉ. निंबाळकर यांच्या गोटातून उमेदवार दिला जाणारच, असे बोलले जात आहे. हलगेकर यांच्या गोटातून सुध्दा एकाद्याला पुढे करून हलगेकर स्वत: हात वर करतील. सद्यस्थितीत म.ए.समितीकडे या निवडणुकीत सहभाग घेण्याइतकी कुमक तर नाहीच; शिवाय योग्य असा उमेदवार तर नाहीच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून केवळ काड्या घातल्या जातील. अलिकडेच झालेल्या एका बैठकीत माजी आमदार दिगंबर पाटलांनी समितीची भूमिका स्पष्ट करतांना ‘सालाबाद’प्रमाणे अरविंद पाटील यांना विरोध दर्शविला आहे. समिती यावेळी कुणाचा ‘विडा’ उचलणार याबाबत मात्र त्यांनी वाच्यता केली नाही.
एकंदर, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने ‘मदाऱ्यांचा खेळ’ रंगात आला असून माकडांच्या उड्यादेखील भलतीच मजा आणत आहेत. येणाऱ्या काळात तालुक्यातील राजकारणाची दशा होऊ न देता, दिशा ठरविण्याची जबाबदारी केवळ कृषी पत्तीनच्या कारभाऱ्यांवर आहे.

धबाबा कोसळे..धबधबा..! ‘खानापूरा’त निसर्गाविष्कार..
समांतर क्रांती / मान्सून स्पेशल समुद्र सपाटीपासून 649 मीटर म्हणजेच 2129 फुट उंचीवर असलेल्या खानापूर तालुक्यात मलप्रभा (कणकुंबी), म्हादई (देगाव), मार्कंडेय (बैलूर) , काळी नदी (डोंगरगाव), मंगोत्री (मोदेकोप), पांढरी नदी (कामतगा) या नद्यांचा उगम होतो. त्याशिवाय कळसा, भांडुरा, हलतर, बैलओहोळ, निट्टूर नाला, कुंभार ओहोळ, हालात्री, सुर्ल नाला यासह सुमारे डझनभर नाल्यांचा उगम तालुक्याच्या पश्चिम भागातून […]