समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
सरकारच्या भपकेबाज योजनांमुळे नागरीक कसे अडचणीत येतात, याचा अनुभव सध्या जोयडा तालुक्यातील लोक घेत आहेत. तीच वेळ खानापूर तालुक्यावर सुध्दा येणार असली तरी नागरीक सरकारच्या भूलथापांना बळी पडतांना दिसत आहे.

जोयडा जात्यात..वननिवासींचे अरण्यरुदन
काळी व्याघ्र अभयारण्यातून जोयडा तालुक्यातील ६३० कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अद्यापही ही प्रक्रिया सुरू आहे. स्थलांतरानंतर आता या कुटुंबांनी तक्रार करून स्थलांतरास विरोध दर्शविला आहे. स्थलांतर योजनेत १४८ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा नागरीकांचा आरोप आहेच; शिवाय सरकारकडून केवळ १५ लाख देऊन बोळवण केली जात असल्याचे स्थानिक नागरीकांचे म्हणणे आहे.
आधी स्वेच्छा स्थलांतराचा प्रस्ताव वननिवासी कुटुंबासमोर ठेवण्यात आला होता. पण, त्या कुटुंबांनी हा प्रस्ताव नाकारला. १५ लाखांत पूनर्वसन अशक्य असल्याने आपण शेती, घर सोडून कोठेही जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. वनखात्याने स्थानिकांना अनेक प्रलोभणे दाखविली. पण, नागरीक बधले नाहीत. त्यानंतर वनखात्याने तोडा-फोडा आणि निर्णय लादा, असा पवित्रा घेत ६३० कुटुंबांना स्थलांतरास राजी केले. त्यासाठी तुम्हाला सोयी-सुविधा मिळणार नाहीत, जंगलातून बाहेर पडा, अशी धमकीवजा भिती पसरविण्यात आली.
६३० कुटुंबांच्या स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपणाला फसविले गेल्याचे या कुटुंबीयांच्या लक्षात आले. आता त्यांना बळजबरीने जंगलाबाहेर काढण्यासाठी वनखाते सरसावले आहे. याविरोधात ८ ऑक्टोबर रोजी कुंभारवाडा येथील वनखात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. ३० ऑक्टोबरपर्यंत मागण्यांची पूर्तता करण्याची हमी वनखात्याने दिली आहे. स्थलांतर केलेल्या कुटुंबांवर मात्र त्यांच्या आततायीपणामुळे संकट ओढवले आहे.
खानापूर सुपात.. आततायीपणा भोवणार?
भीमगड अभयारण्यातील १३ गावांच्या स्थलांतराची घिसाडघाई प्रशासनाने चालविली आहे. तळेवाडीतील १३ कुटुंबांना वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी प्रत्येकी १५ लाखांच्या धनादेशाचे वितरण करून स्थलांतराचा शुभारंभ (?) देखील केला आहे. त्याशिवाय कोंगळा आणि आमगावातील नागरीकांनी स्वेच्छा स्थलांतराची तयारी दर्शविली आहे. मुलभूत सुविधांपासून वंचीत असलेल्या भीमगड अभयारण्याची रहिवाशांना १५ लाखांची लालूच दाखविण्यात आल्यामुळे स्थलांतरास नागरीकांनी मान्यता दिली असली तरी त्यांना इतर सुविधा देण्याबाबतची कोणतीच तरतूद सरकारने केलेली नाही.
जोयडा तालुक्यातील गावांप्रमाणेच खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याची गावांतील कुटुंबावर संकट कोसळण्याची शक्यता असून स्थानिकांनी आधी सोयी-सुविधा, नंतरच स्थलांतर या मागणीवर ठाम राहणे गरजेचे आहे. न झाल्यास आगीतून फुफाट्यात अशी या कुटुंबांची गत होणार आहे.
किती कुटुंबांचे होणार स्थलांतर?
कोंगळा मध्ये 63 कुटुंबे, पास्तोलीमध्ये 36, गवाळी 90, अबनाळीमध्ये 81, जामगावमध्ये 82, हेम्मडगामध्ये 128, तळेवाडीत 13, देगावमध्ये 31, पालीमध्ये 73, मेंडिलमध्ये 40, कृष्णापूरमध्ये 12, होल्डामध्ये 7 आणि आमगावमध्ये 98 कुटुंबे आहेत. या सर्व कुटुंबांसोबत 1540 पुरुष आणि 1442 महिला, एकूण 3059 जण येथे राहतात.


‘मार्केटिंग’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची अविरोध निवड
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुका कृषी उत्पन्न खरेदी-विक्री संघांच्या (मार्केटींग सोसायटी) अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड अविरोध करण्यात आली आहे. सोसायटीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी निर्विवाद सत्ता स्थापन केली. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे १३ पैकी १० संचालकांची निवड अविरोध झाली होती, तर तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांच्याच पॅनेलच्या संचालकांनी बाजी मारली […]