
समांतर क्रांती / कणकुंबी
चोर्ला घाट जैववैविधतेने परिपूर्ण असून तेथे अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आणि पशू-पक्षी आढळतात. नुकताच या भागात स्कर्ट मशरुम (व्हील्ड लेडी) आणि मलबार ट्री-टोड बेडकाची प्रजाती आढळली आहे. भीमगड आणि म्हादई अभयारण्याच्या अखत्यारितील या जंगलातून मोठ्या प्रमाणात दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांची तस्करी होते. सध्या जंपिंग चिकनसाठी बेडकांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चोर्ला घाट आणि कणकुंबी परिसरातील नाले आणि पाणथळ जंगलातून बेडकांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बेडूक बाहेर पडतात. गोव्यातील अनेक हॉटेलमध्ये जंपिंग चिकन म्हणून त्यांच्यावर खवय्ये ताव मारतात. त्यासाठी गोव्यात तसेच गोव्याबाहेरून मोठ्या प्रमाणात बेडकांची तस्करी होते. पाच वर्षांपूर्वी काणकोणजवळ एका ट्रकमधून बेडकांची तस्करी करीत असतांना कारवाई करण्यात आली होती. ते बेडूक कारवारमधून निर्यात केले जात होते. त्यानंतर गोवा सरकारच्या वनविभागाने बेडकांच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आता तस्करांनी चोर्ला घाट आणि कणकुंबी परिसरातील नाले आणि पाणथळ जंगलांकडे मोर्चा वळविला आहे.
जंपिंग चिकनसाठी बेडकांची तसस्करी वाढली असून त्यामुळे अनेक दुर्मिळ बेडकांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता पर्यावरण अभ्यासकांतून वर्तविली जात आहे. बेडकांच्या संवर्धनासाठी वनविभागाने विशेष मोहीम हाती घेण्याची आवश्यकता आहे.
जंपिंग चिकन म्हणजे काय?

बेडकांचा खाण्यासाठी वापर केला जातो, हे अनेकांना आश्चर्यकारक वाटत असले तरी गोव्यात अनेक हॉटेलमधून जंपिंग चिकनच्या नावाखाली बेडकांच्या मटनाला मोठी मागणी आहे. यासाठी विशेषत: हिरवी कातडी असलेले मोठे बेडूक वापरले जातात. इंडियन बुल फ्रॉग, कॉमन पॉड फ्रॉग, ग्रास फ्रॉग आणि कॉमन इंडियन टोड या बेडकांचा समावेश असतो. जे पाणथळ जंगलात आणि ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या जंपिंग चिकनला गोव्यात परदेशी पर्यटकांची मोठी मागणी आहे. गोव्यातील सासष्टी भागातील लोक मोठ्या आवडीने जंपिंग चिकनवर ताव मारतात.
अन्नसाखळीवर परिणाम

बेडकांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अन्नसाखळीवर परिणाम होतो. बेडूक किडे आणि डासांचे भक्षण करतात. त्यामुळे त्यांचे प्रमाण नियंत्रीत राहते. पण, बेडकांची संख्या कमी होत असल्याने डास आणि किटकांचा प्रादूर्भाव वाढून मलेरिया, फिलीरीया आणि एन्सेफालिटीस सारखे रोग बळावतात. १९७२ च्या वनकायद्यानुसार बेडकांच्या शिकारीवर बंदी असून बेडकाची शिकार केल्यास, मांस खाल्यास अथवा हॉटेलमध्ये जंपिंग चिकन उपलब्ध करून दिल्यास रु. २५ हजारांचा दंड आणि तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

हवालदार जगदीश काद्रोळींचा एस.पीं.कडून सत्कार
बेळगाव: खानापूर पोलिस स्थानकाचे हवालदार जगदीश काद्रोळी यांचा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. भिमाशंकर गुळेद यांनी सन्मान केला. गुन्हे शाखेत जगदीश यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रशंसापत्र देऊन प्रोत्साहीत करण्यात आले.पोलिस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ. गुळेद यांनी चांगली कामगिरी केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.