मंडे स्पेशल / चेतन लक्केबैलकर
पावसाने उसंत घेतल्याने खानापूर तालुक्यात भाताच्या रोपलावणीला जोर आला आहे. पण, रोपांची टंचाई आणि मजुरांची कमतरता यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे ओल्या दुष्काळचे ढग दाटले आहेत. तर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात जंगली श्वापदांनी उच्छांद मांडला आहे. रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे प्रवाशी घायकुतीला आले असून अपघातांचा आलेख वाढत चालला आहे. एकंदर, तालुक्यात कांहीच अलबेल नसतांना तालुक्याच्या राजकारणाला मात्र सुगीचे दिवस आले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचे पडसाद आतापासून तालुक्याच्या राजकारण उमटू लागले असून नेते मंडळी ‘पेरणीपूर्व मशागती’त रमले आहेत. परंतु, राजकारणाची दररोज बदलणारी दिशा पाहता भाजप आणि काँग्रेसमध्ये बेदिलीची शक्यता आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या अर्थकारणाचा प्रमुख कणा असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक बळकावण्यासाठी जिल्ह्यातील राजकारण्यांनी दंड थोपटले आहेत. त्यात सध्या जारकीहोळ्ळी कुटुंबीयांनी आघाडी घेतली आहे. कित्येक वर्षे कत्ती बंधूचे वर्चस्व असलेल्या या बॅंकेवर मांड कायम ठेवण्यासाठी जारकीहोळ्ळी बंधुंनी पराकाष्टा चालविली आहे. त्याचे पडसाद जिल्ह्यातील इतर तालुक्यात सुध्दा उमटत आहेत. दुसऱ्यांच्या जोंजळीने पाणी पिण्याची सवय लागून राहिलेल्या खानापूर तालुक्यातील राजकारण्यांनी ही संधी साधण्यासाठी चढाओढ चालविली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पक्षविरहीत होत असते. मात्र, व्यक्तिपूजेला भलतेच महत्व येते. त्यामुळे पक्षांचे संघटनात्मक बळ खचते.
काँग्रेसला फुटीचे ग्रहण..
सध्या भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली असून दोन्ही पक्षांत बेदिलीची नांदी झाली आहे. काँग्रेसकडून मागील निवडणुकीत तत्कालीन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना केवळ दोन मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. मागील वेळी त्यांना विद्यमान संचालक अरविंद पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय पाठिंबा लाभला होता. यावेळी मात्र त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ तर नाहीच; शिवाय सर्वपक्षीय नेत्यांचा ‘वरदहस्त’ही नाही. साहजिकच त्या स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतण्याची शक्यता धूसर आहे. पण, त्यांच्याच पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांनी तालुक्यात चाचपणी करून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. ‘अक्का विरुध्द ताई’ असा हा सामना निश्चित होत असतांना काँग्रेसी नेते व कार्यकर्त्यांनी ‘कांचनम् सिध्दी’च्या मागे लागून आमदार हट्टीहोळ्ळींच्या वळचणीला जाणे पसंद केले आहे.
आधीच काँग्रेसमध्ये ‘उल्हास’ होता, त्यात आमदार हट्टीहोळ्ळींच्या माध्यमातून संधी मिळाल्याने डॉ. निंबाळकर यांच्यासमवेत असलेल्या काँग्रेसजणांनी ‘ताईं’चा हात सोडून ‘अक्कां’ना सलाम ठोकण्यास सुरूवात केली आहे. ब्लॅाकच्या दोन्ही अध्यक्षांसह विविध विभागांचे पदाधिकारी खुलेआम अक्कांचे समर्थन करतांना दिसत आहेत. तुंबून राहिलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनांना आमदार हट्टीहोळ्ळी पर्याय म्हणून समोर आले आहेत. काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून विस्कटलेली घडी बसवितांना भविष्यात डॉ. निंबाळकर यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या तालुक्यातील अस्तित्वालाच आव्हान उभे ठाकले आहे.
भाजपमध्येही सुंदोपसुंदी..
माजी आमदार आणि विद्यमान संचालक अरविंद पाटील यांनी पाचव्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सोपान चढण्याची तयारी केली असतांनाच त्यांच्याच भाजप पक्षातून गर्लगुंजी कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष राजू सिध्दाणी यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर करून भाजपमधील फुटीचे दर्शन घडविले आहे. त्यात आता आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्या दोघांना काटशह देत स्वत: निवडणुकीच्या रिंगणात राहण्याचे संकेत दिले आहेत. भाजप आमदार भालचंद्र जारकीहोळ्ळी यांनी माजी आमदार पाटील आणि आमदार हलगेकर यांना कानपिचक्या दिल्या होत्या. पण, स्थानिक राजकारणाचा धुसमुसळेपणा आणि व्यक्तीगत अस्मिता, वर्चस्ववाद तसेच अंतर्गत कलहातून त्या दोघांमधील धुसपूस वाढत चालली आहे. व्यक्तिपूजक भाजप नेत्यांनी ही संधी साधत फुटीची वाट मोकळी केली आहे. त्यामुळे ‘पार्टी वीथ डिफरन्स्’ नाही तर ‘पार्टी विथ डिफरन्सीस’ अशी भाजपचे गत झाली आहे.
नेत्यांचा खेळ; संघटनेचा खेळखंडोबा..
काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी सध्या एकमेकांवर कुरघोडी चालविली आहे. त्यांच्यावर खरंतर पक्षाध्यक्ष वा पक्ष संघटनेने वचक ठेवायला हवा. पण, निवडणुकांत ‘थैल्या’ घेऊन कार्यरत राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची तो नैतिक अधिकार गमावला आहे. त्याचीच परिणती पक्ष फुटीत होत आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक रणधुमाळीकडे साफ दुर्लक्ष करीत त्या गावाचे नसल्याचा आव आणला आहे. तोच प्रकार काँग्रेसमध्ये सुध्दा सुरू आहे. ग्रामिण आणि शहर ब्लॉकच्या अध्यक्षांनी कुणाची कास धरली आहे? हे सांगता येत नसले तरी त्यांची डॉ. निंबाळकर यांचा ‘हात’ सोडला आहे, हे मात्र नक्की. अलिकडेच मागास विभागाचे अध्यक्ष नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी राजिनामा दिला. त्यांनी राजिनामा का दिला? याबाबत पक्षनेत्या म्हणून डॉ. निंबाळकर यांनी आत्मचिंतन केले नाही. त्यामुळे त्यांच्या पाठिराख्यांनी पुढचे पाऊल टाकण्याचे धाडस केले.
भविष्याचा वेध; पाय मात्र खोलातच..
माजी आमदार पाटील वरचढ होतील, याची भिती आमदार हलगेकर यांना वाटणे साहजिकच आहे. पाटलांचा आक्रमकपणा हा त्यांचा धुसमुळेपणा ठरला असल्याने पुढील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या त्यांच्या पक्षातील सर्वानाच ते डोईजड वाटत आहेत. त्यातूनच त्यांच्या विरोधकांची संख्या वाढली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाटेवरून विधानसभेचा सोपान चढण्याची घाई लागल्याने खेकडावृत्ती बळवली आहे. अगदी तोच प्रकार काँग्रेसमध्येही सुरू आहे. स्थानिक पातळीवर डॉ. निंबाळकर यांच्याशी स्पर्धा करणारे नेतृत्व पक्षाकडे नाही. पण, आता जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या निमित्ताने नवेच वादळ येऊ घातले आहे. अक्कांची तालुक्यातील ‘एन्ट्री’ महागात पडणार असल्याने आणि पदाधिकाऱ्यांनी सुध्दा त्यांचे समर्थन चालविल्यामुळे पुढील राजकारण बेभरवशाचे बनले आहे. एकुणच, नेत्यांनी चालविलेल्या खेळात त्यांचे पाय आणखी खोलात रुतत चालले आहेत.
आव्हान डॅमेज कन्ट्रोलचे..
भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासाचे तीनतेरा वाजविले असल्याने त्यांचा करिश्मा उतरला आहे. परिणामी, सर्वसामान्य जनता पर्यायाच्या शोधात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने ती संधी मिळाली आहे. त्यातच दोन्ही पक्षांना फुटीचे ग्रहण लागले आहे. अशात आता दोन्ही पक्षांसमोर डॅमेज कंट्रोलचे आव्हान आहे. ते आव्हान कसे स्विकारले जाणार आणि संभाव्य पडझडीवर नियंत्रण कसे ठेवणार यावर दोन्ही पक्षातील नेत्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. तूर्तास जिल्हा मध्यवर्ती बँकेची मोर्चेबांधणी करतांना दुष्काळाचे ढग मात्र दाटून आल्याचे चित्र आहे.

Accident: अपघातात नंदगडचा तरूण ठार
समांतर क्रांती / नंदगड पुणे-बंगळूर महामार्गावरील विचित्र अपघातात नंदगड येथील ३० वर्षीय तरूण ठार झाल्याची घटना काल रविवारी (ता.६) घडली. रफिक बशिरअहमद जांबोटी (वय ३०, रा. नंदगड) असे मयताचे नाव असून तो महामार्गावरील दोन ट्रकचा अपघात पाहत असतांना त्याच्यासह अन्य एका दुचाकीस्वारावर काळाने घाला घातला. या अपघातात शिवाप्पा चंबाप्पा शहापूर (६३, रा. हुबळी) हा दुचाकीस्वार […]