
समांतर क्रांती / डेस्क
केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश, मान्सून गोव्यात पोहचला, मान्सूनची कर्नाटक-महाराष्ट्रात सलामी अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. मान्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये सहसा १ जूनला मान्सून दाखल होतो. त्यानंतर इतर राज्यात मान्सून दाखल होण्याच्याही तारखा ठरलेल्या आहेत. देशभरात मान्सून दाखल व्हायला किती दिवस लागत असतील? असा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. आयएमडी अर्थात इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या नव्या निकषानुसार देशातील सर्व राज्यात मान्सून पसरायला ३८ दिवस लागतात. पूर्वीच्या निकषानुसार ४५ दिवस लागत होते. यंदाही मान्सूनने चपळ डाव साधला असून आवघ्या २९ दिवसात मान्सूनने देश व्यापला आहे.
२०१३ मध्ये मान्सूनचा चपळ डाव
भारतीय शेती ही पूर्णत: मान्सूनवर आवलंबून आहे. साहजिकच शेतकऱ्यांसह सर्वच जण मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. दरवर्षी केरळमध्ये मान्सून १ जूनला प्रवेश करतो. तेथून मजल-दरमजल करीत तो सरासरी ३८ दिवसात देशातील इतर राज्यात पोहचतो. २००२ मध्ये मान्सूनला देशभरात पसरायला सर्वाधिक ७८ दिवस लागले होते. २९ मे रोजी केरळात दाखल झालेला मान्सून २० ऑगस्ट रोजी देशभरात पोहचला होता. तर २०१३ मध्ये मान्सूनने चपळ डाव साधला होता. आवघ्या १५ दिवसात मान्सूनने देशभरात जम बसविला होता. यंदा २९ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. आणि आवघ्या २९ दिवसात मान्सूनने देशातील सर्व राज्ये व्यापली आहेत.
आगमनही लवकर..
सहस: मान्सूनचे केरळमध्ये १ जून रोजी आगमन होते. पण गेल्या १०० वर्षात १९१८ साली ११ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. तर सर्वात उशिरा १८ जून १९७२ साली मान्सून केरळात दाखल झाला होता. अलिकडे सर्रास मान्सून जूनच्या जवळपास केरळात प्रवेश करतो. गेल्या २० वर्षांच्या कालावधीत मान्सून वेळेत हजर झाला आहे. २००४ मध्ये १८ मे तर २००९ मध्ये २३ मे रोजी मान्सूनचे केरळमधून आगमन झाले होते. यंदा मान्सूनपूर्व आवकाळी पावसानेच दक्षिणेतील राज्यांना झोडपले होते. वादळामुळे यंदा मान्सून चार दिवस आधीच थडकला होता.
जुलैमध्ये अतिवृष्टीची अंदाज
मान्सूनचे अवेळी आगमन हे प्रलयकारी असते, याची प्रचिती वारंवार आली आहे. २००४ आणि २००९ साली अशाच प्रकारे मान्सून निर्धारित वेळेआधीच थडकला होता. त्यावर्षी देशभरात अतिवृष्टीमुळे महापूराचा सामना करावा लागला होता. यंदाही जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजे १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

स्पर्धा परीक्षा, करिअर घडवण्याचे सर्वात उत्तम माध्यम : वासुदेव चौगुले
समांतर क्रांती / खानापूर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्पर्धेला सामोरे जाणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक अवस्थेत स्पर्धा परीक्षांची तोंड ओळख झाल्यास भविष्यात त्यांना करिअरची वाट निवडणे सोपे ठरते. स्पर्धा परीक्षा, करिअर घडवण्याचे सर्वात उत्तम माध्यम आहे. त्या दृष्टीने पालकांनी अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी पोषक वातावरण निर्माण करावे. मनाजोगे करिअर निवडून समाज व राष्ट्रसेवेचा राजमार्ग […]