
समांतर क्रांती / व्यक्तिविशेष
चेतन लक्केबैलकर
कार्यकर्ता ही जमात आताश: लोप पावत चालली आहे. आता गल्लीबोळातून गावगन्ना पुढाऱ्यांचे पेव फुटले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आपला पुढारी म्हणून कुणाचा झेंडा हाती घ्यावा, हा डोंगराएवढा प्रश्न पडला असतांना प्रसाद पाटील यांच्या सारखा सामान्य कार्यकर्ता ‘आधारवड’ बनून समोर येतो. समाजातल्या रांजल्या-गांजल्या जनतेला हा त्याचा आधार लढण्याचे बळ देतो. गर्लगुंजी येथील प्रसाद पाटील हे अनेक संघ-संस्थांचे आश्रयदाते आहेत. पण, त्यांच्या नावापुढे बिरुदावली शोभत नाही. कारण, त्यांच्या नावातच वेगळेपण सामावले आहे. त्यामुळेच प्रसाद पाटील म्हटलं की, आपसूक गर्लगुंजीचे का? असा प्रश्न विचारला जातो. त्यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त या धडपड्या कार्यकर्त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.
प्रसादला समाजसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाले. शाळकरी असतांना सुध्दा घरातून दिलेल्या पैशातून सोबतच्या मित्रांमध्ये चॉकलेट वाटून खाणारा प्रसाद पुढे जाऊन समाजसेवेला वाहून घेईल असे कुणालाही वाटले नव्हते. मुळातच घरातील वातावरण धार्मिक पण, अंधश्रध्देपासून कोसोमैल दूर. वडील हाडाचे शिक्षक. मृदू स्वभावाचे. त्यांचे अनुकरण करीत प्रसादने शिक्षणात ठसा उमटविला. बी. ई. बायोटेक, पीजीडी न्यट्रीशियन अशा पदव्या त्याने संपादीत केल्या. त्याशिवाय एम.एस.डब्लू ही समाजसेवेतील पदव्यूत्तर पदवीदेखील मिळविली आहे. इतकेच नाही तर त्याने बायोटेकमध्ये आतंरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे.
कांही लोकांना आपल्या पदव्या आणि कामांचे उदात्तीकरण करून स्वत:ला सिध्द करायचे नसते. ते त्यांच्या कामातून आपले अस्तित्व दाखवून देत असतात. प्रसाद या ‘कॅटॅगिरी’तला आहे. अनेक पदव्या पदरात पडल्यानंतर त्याला सहज मोठ्या पगाराची नोकरी सांगून आली असती. तशा अनेक नोकऱ्यांची ऑफर त्याला आल्या. पण, त्याला समाजकारण करायचे होते. राजकारणात रस नव्हताच. पण, म्हणतात ना सत्तेशीवाय शहाणपण नाही. म्हणून लोकाग्रहास्तव प्रसादने ग्राम पंचायतीची निवडणूक लढविली. लोकांनी प्रचंड बहुमतांने निवडून दिले. ही त्याने केलेल्या कामाची पोचपावती होती. सुरूवातीपासून समाजसेवेची आवड असल्याने त्याने तरूणांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली. आपल्या ओळखीतून त्याने अनेक महनिय व्यक्तींशी सलोख्याचे संबंध निर्माण केले आहेत. त्या ओळखींचा फायदा घेत त्याने अनेक तरूणांना नोकऱ्या लावल्या. उद्योग – व्यवसायासाठी मदत केली. त्यातून त्याचा लोकसंपर्क वाढला.

बेळगाव-धारवाड रेल्वेला मंजूरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना एकत्र करून त्याने आंदोलन उभे केले. कवडीमोलांना सुपिक जमिनी घशात घालणाऱ्या सरकारच्या विरोधात शड्डू ठोकणे सोपे नव्हते. पण, त्याने ही लढाई लढली. अजूनही लढत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन केले जाऊ नये, यासाठी त्यांने दिल्लीपर्यंत अर्ज-विनंत्या केल्या. दुर्गम खानापूर तालुक्यातील ढेपाळलेली आरोग्य सेवा लक्षात घेऊन त्याने केएलई या संस्थेच्या होस्पिटलमार्फत गर्लगुंजीसह तालुक्यातील निट्टूर, बरगाव, तोपिनकट्टी, बैलूर, माडीगुंजी पंचायतीमध्ये आरोग्य सेवा केंद्र सुरू करून घेतली. त्याचा फायदा हजारो रुग्णांना होत आहे.
पंचायतीचा सदस्य झाल्यानंतर सुद्धा त्याने कधी ‘राजकारण’ केले नाही. जो आपल्या लोकांच्या फायद्याचा त्याच्याशी मैत्री केली. ती जपली. त्यामुळेच त्याने अनेक नेत्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी कोट्यांचा निधी मिळावीला. ज्यांच्यामुळे आपण समाजात ताठ मानेने वावरतो ते आईवडील प्रेरणास्थानी ठेवत. आणि ज्यांनी मार्ग दाखवला त्यांना शिरोधार मानून प्रसादने आपली समाजसेवा चालविली आहे. त्यात काटे पेरणारेही आहेतच, त्यांनाही आपलंस करणारी किमया केवळ प्रसादलाच अवगत आहे.
हाकेला धावून येणारा कार्यकर्ता अशी प्रसादची विशेष ओळख. शेतकरी आणि विद्यार्थ्यांविषयी जरा अधिकच कळवळा. त्यामुळे तालुक्यातील बससेवेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे कानावर आले तरी प्रसाद दुसऱ्या दिवशी परिवहन खात्याचे कार्यालय गाठतो. बससेवा सुरू होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतो. एखाद्या शेतकऱ्यावर संकट ओढवल्यास तात्काळ धावून जातो, मदत करतो. पण, त्याची गंधवार्ता सुध्दा कुणाला लागू ददेत नाही. एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला समजू नये, याची काळजी प्रसाद नेहमी घेतो. पशू वैद्यकीय, कृषी खाते तसेच वैज्ञनिकांची शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे भरवितो. इतकच नाही, तर नेहमी पायाला चाकं लावून शाससकीय कार्यालयात लोकांची कामे करीत फिरतांना दिसतो.

प्रसादबाबत सांगण्यासारखी विशेष बाब म्हणजे तो त्याने स्वत: ३२ वेळा रक्तदान केले आहे. रुग्णांच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेत त्याने अनेकांचे जीव वाचविले आहेत. त्याच्या या कार्याची दखल घेत २००९-१० तामिळनाडू येथे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बेंगळूच्या पी.आय.एम.एस. ने त्याने सादर केलेल्या प्रबंधाला पहिले पारितोषीक दिले आहे. तसेच २०२४ मध्ये दै. पुढारीने त्याला युथ आयकॉन म्हणून सन्मानीत केले आहे. प्रसाद राजकारणात सक्रीय झाला असला तरी नि:पक्षपातीपणे त्याची समाजसेवा अविरत सुरू आहे. खऱ्या अर्थाने तो युथ आयकॉन ठरला आहे. वाढदिवसानिमित्त त्याला आभाळभर शुभेच्छा..!

कडाक्याच्या थंडीत खानापूर तालुका पेटला होता, तेव्हा..
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्याचा पश्चिम घाट हा संहिष्णू लोकांचा अधिवास. त्यांच्याकडून शासन यंत्रणेला कोणत्याच प्रकारचा धोका नाही. त्यामुळे या भागावर नेहमीच अनन्वित अन्याय होत आला आहे. त्याचाच परिपार म्हणून तेथील लोकांना आता स्थलांतर करावे लागत आहे. पण, एकदा हा पश्चिम घाट ऐन हिवाळ्यात पेटला होता. त्याची ही कौर्यगाथा.. १५ नोव्हेंबर २०१४ रोजी […]