
समांतर क्रांती / खानापूर
खानापूर तालुक्यातील सर्रास रस्त्यांची चाळण झाली आहे. राज्य महामार्गांची दूरवस्था अपघातांना निमंत्रण देत आहेच, पण गावांच्या संपर्क रस्त्यावरील खड्ड्यांनी सुध्दा प्रवाशांचे कंबारडे मोडले आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी रस्त्यांची डागडुजी करण्यात अपयशी ठरल्यामुळे आता लोकांनाच आपापल्या गावच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याची वेळ आली आहे. ग्रामस्थ श्रमदान करून रस्त्यांची डागडुजी करीत असल्याने त्यांचे कौतूक होत आहे. तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि नेतेगिरी करणाऱ्यांना ही लाज आणणारी बाब असल्याची संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
पडलवाडी ते हलसाल क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने बससेवा बंद करण्यात आली होती. परिणामी, विद्यार्थ्यांसह नागरिकांची परवड सुरू होती. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना याची कल्पना दिल्यानंतरही खड्डे बुजवले गेले नाहीत. त्यामुळे पडलवाडी ग्रामस्थांनी श्रमदान करीत खड्डे बुजविले. त्यामुळे बंद असलेली बससेवा पुर्ववत सुरू झाली आहे. श्रमदान करून ग्रामस्थांनी एकप्रकारे शासन-प्रशासनाला सणसणीत चपराकच दिली आहे. या उपक्रमात विलास देसाई, सुनिल देसाई, मारूती कांबळे, मयूर देसाई, यल्लाप्पा कुरगुप्पी, नारायण मादार,तानाजी तांबुळकर, वैशाली तांबुळकर, निता चौरी आदि सहभागी झाले होते.
एरवी, मत मागण्यासाठी गावागावात जाऊन ग्रामस्थापुढे लोटांगण घालणारे नेते मंडळी गावांच्या समस्यांकडे मात्र साफ दुर्लक्ष करीत आहेत. गावकऱ्यांनाच रस्त्याची डागडुजी करावी लागत असेल तर तालुक्याला लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची काय गरज आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खरंतर पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी करणे आवश्यक होते, पण त्याकडे कुणीच लक्ष दिले नसल्याने सध्या तालुक्यातील रस्त्यांची दयनीय आवस्था झाली आहे. त्याबद्दल संताप व्यक्त केला जात असून प्रवाशी शासन-प्रशासनाच्या नावे लाखोल्या वाहत आहेत.


खानापूरचे राजकारण : पेरणीपूर्व मशागत आणि दुष्काळाचे ढग
मंडे स्पेशल / चेतन लक्केबैलकर पावसाने उसंत घेतल्याने खानापूर तालुक्यात भाताच्या रोपलावणीला जोर आला आहे. पण, रोपांची टंचाई आणि मजुरांची कमतरता यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे ओल्या दुष्काळचे ढग दाटले आहेत. तर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात जंगली श्वापदांनी उच्छांद मांडला आहे. रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे प्रवाशी घायकुतीला आले असून अपघातांचा आलेख वाढत चालला आहे. […]