
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
अल्पवयीन तरूणींना परराज्यात नोकरीच्या आमिषाने पाठविणात आल्याच्या प्रकरणी रामनगर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. खानापूर पोलिसांनी मात्र या प्रकरणी कानावर हात ठेवले असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी महिला आयोगाकडे धाव घेण्याची तयारी कांही समाजसेवी संघटनांनी केली आहे.
जोयडा आणि खानापूर तालुक्यातील सीमावर्ती भागातील पालकांना बक्कळ पगाराचे आमिष दाखवून अल्पवयीन तरूणींना एजंटाकरवी परराज्यात तस्करी केली जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत बातमी प्रसिध्द झाल्यानंतर रामनगर पोलिसांनी त्यांच्या अखत्यारीतील संबंधीत गावांमध्ये चौकशीला सुरूवात केली आहे. या प्रकरणात लोंढा पोलिसांच्या अखत्यारीतील एकाच गावातून वर्षभरात तब्बल ११ अल्पवयीन तरूणी परराज्यात गेल्या आहेत. तरीही याबाबत कोणत्याच प्रकारची चौकशी पोलिसांकडून केली गेलेली नाही.
दहावीत शिकणाऱ्या १५ हून अधिक मुलींनी शाळा अर्ध्यावर सोडल्यामुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. खानापूर तालुक्यातील एकाच गावातील ११ मुलींनी वर्षभरात अर्ध्यावर शाळा सोडली. त्यांच्या पालकांकडे शाळा प्रशासनाने चौकशी केल्यानंतर थातूरमातूर उत्तरे देण्यात आली आहेत. त्या सर्व मुली त्या गावामध्ये नाहीत. त्यांना नोकरीसाठी परराज्यात पाठविण्यात आले असल्याचे स्थानिक सांगत असले तरी पालकांकडून कांहीच उत्तर मिळत नसल्याने संशय बळावला आहे.
याबाबत खानापूर पोलिसांशी संपर्क साधला असता, याबाबत आपणाला कांहीच माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, परराज्यात गेलेल्या मुलींची यादी ‘समांतर क्रांती’कडे उपलब्ध झाली आहे. पोलिस एजंटांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत असून कांही समाजसेवी संघटनांनी ही बाब महिला आयोगाच्या निदर्शनास आणून देण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच याबाबत बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुखांनी खानापूर पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.
भयंकर प्रकार घडल्यानंतर सुध्दा..
परराज्यात नोकरीसाठी गेलेल्या एका तरूणीच्याबाबतीत एक भयंकर घटना उघडकीस आल्यानंतरही या परिसरातील पालक त्यांच्या अल्पवयीन मुलींना नोकरीच्या निमित्ताने परराज्यात पाठवत असल्याने आश्चर्यवजा संताप व्यक्त केला जात आहे.
रामनगर येथील एक तरूणी नोकरीसाठी परराज्यात गेली होती. तेथे तिची ओळख एका तरूणाशी झाली. त्या तरूणांने तिच्या गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती घरी परत आली. पण, कांही दिवसांनी त्या तरूणांने तिच्या नावाने फेक इन्स्टाग्राम अकांउंट काढून त्यावर तिचे अश्लिल फोटो व व्हीडीओ अपलोड केले. तसेच तो तिला ब्लॅकमेल करू लागला. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेतून परिसरातील नागरीकांनी कांहीच धडा घेतलेला नाही. तसेच पोलिसांनी सुध्दा या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोणतीच पावले उचलेली नाहीत.
मोठे स्कँडल असण्याची शक्यता
मुलींना परराज्यात नोकरीसाठी पाठविण्याचे हे मोठे स्कँडल असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संशय येऊ नये म्हणून एजंटांनी दहा मुलींमागे दोन मुलांना नोकरीसाठी परराज्यात पाठविले आहे. यात ज्या तरूणी आहेत, त्यांचे वय १४ ते १६ इतके आहे. एजंटांची साखळी असून त्यात स्थानिक एजंट महत्वाची भूमिका बजावत असून त्यांना एका मुलींला परराज्यात पाठविण्यासाठी १२०० रुपये मिळतात, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. या स्कँडलचे धागेदोरे गोवा ते कोलकत्ता आणि मुंबईपर्यंत पोहचले आहेत.

लंपी आणि लाळ्या खुरकतचे लसीकरण त्वरीत पूर्ण करा
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात बाहेरील जिल्ह्यातून भरपूर प्रमाणात शेळ्या मेंढ्याचे कळप येतात. लाळ्या खुरकतचे प्रमाण प्रमाण वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यासाठी पशुवैद्यकीय खात्याने या रोगराईवर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण हाती घ्यावे, अशा आशयाचे निवेदन गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी पशुवैद्यकीय उपसंचालकांना दिले. […]