समांतर क्रांती / मान्सून स्पेशल
समुद्र सपाटीपासून 649 मीटर म्हणजेच 2129 फुट उंचीवर असलेल्या खानापूर तालुक्यात मलप्रभा (कणकुंबी), म्हादई (देगाव), मार्कंडेय (बैलूर) , काळी नदी (डोंगरगाव), मंगोत्री (मोदेकोप), पांढरी नदी (कामतगा) या नद्यांचा उगम होतो. त्याशिवाय कळसा, भांडुरा, हलतर, बैलओहोळ, निट्टूर नाला, कुंभार ओहोळ, हालात्री, सुर्ल नाला यासह सुमारे डझनभर नाल्यांचा उगम तालुक्याच्या पश्चिम भागातून झाला आहे. नदी-नाल्यांवरील फेसाळत धबाबा कोसळणारे धबधबे हे वर्षा पर्यटकांसाठी नेहमीच पर्वणी ठरले आहेत. पश्चिम भागात बारा जणांचा, देवसाचा, म्हातारीचा, सुरल, शिंबोळी, तळत्री, वज्रपोहा, लाडकीचा धबधबा असे अनेक धबधबे आहेत. त्याशिवाय डोंगर-दर्यांत वसलेली गावं आणि मठ, मंदिरेदेखील तालुक्याच्या वैभवात भर घालतात.

सुरलचा (सुर्ल)धबधबा
चोर्ला राज्य महामार्गावरील गोव्याच्या हद्दीतील सुरल गावातून दिसणारा हा मनमोहक धबधबा सुर्लच्या नाल्यावर आहे. कणकुंबीपासून दहा कि.मी. अंतरावरील सुर्लच्या सड्यावरून हा नयनरम्य नजारा पाहता येतो. या धबधब्याचे वैशिष्ठ्य म्हणजे हा धबधबा कर्नाटकाच्या हद्दीतून गोव्याच्या हद्दीत सुमारे दीडशे फुटावरून खाली झेपावतो. या धबधब्याजवळ कोणत्याही हंगामात जाता येत नाही.

शिंबोळी धबधबा
महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपासून दीड तर गोव्याच्या हद्दीपासून तीन कि.मी.अंतरावरील मान या खानापूर तालुक्यातील गावाजवळ शिंबोळी आणि तळत्री हे दोन धबधबे आहेत. पावसाळ्यात ते पूर्ण क्षमतेने कोसळत असतात. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक या धबधब्यांना भेट देऊन वर्षा पर्यटनाचा आनंद लुटतात. शिंबोळी हा डबल डेकर धबधबा आहे.

देऊचा धबधबा
चिखले ते पारवाडच्या रस्त्यावर देऊच्या न्हायीवर असलेला हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. हा धबधबादेखील कर्नाटकाच्या हद्दीतून गोव्याच्या हद्दीत कोसळतो. याच परिसरात सवतुरा धबधबाही आहे. अफाट पसरलेले निसर्गसौदर्य, हिरवीगार शाल पांघरलेले डोंगर आणि धबधब्याची गाज यामुळे पर्यटक तासन्तास या परिसरात पर्यटनाचा आनंद लुटतात.

कणकुंबी धबधबा
कणकुंबी- चिगुळे मार्गावरील हा धबधबा पर्यटकांसाठी आगळीवेगळी पर्वणी ठरला आहे. कणकुंबीपासून आवघ्या दोन कि.मी. अंतरावरील या धबधब्यात पर्यटकांना मनसोक्त डंबता येते. त्यामुळे नेहमीच येथे कौटुंबीक सहलींचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे कणकुंबी आणि चिगुळेच्या माऊलींचे दर्शन आणि चिगुळे विहंगम पर्यटन स्थळाचा आनंद लुटता येतो.

वज्रपोहा धबधबा
भीमगड अभयारण्यात म्हादईवरील हा धबधबा पाहण्यासाठी पायपीट करावी लागते. जांबोटीपासून चापोली आणि पुढे पाच कि.मी. तसेच गवाळीहून सुमारे आठ कि.मी.ची पायपीट केल्यानंतर हा विलोभनीय धबधबा दृष्टीस पडतो. थंडगार तुषार अंगावर झेलतांना पर्यटकांना पायपीट केल्याचे समाधान निश्चितच मिळते. पावसाळ्यात मात्र या ठिकाणी जाणे धोक्याचे ठरते.

लाडकीचा धबधबा
चोर्ला राज्य महामार्गावर महाराष्ट्रातून गोवा आणि कर्नाटकाच्या हद्दीत झेपावणारा हा धबधबा जीवाचा गोवा करणार्या पर्यटकांना आकर्षीत करतो. धबधबा आणि नयनरम्य निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी क्षणभराचा विसावा घेऊनच मार्गाक्रमण करतात. या धबधब्याच्या जवळ सहसा जाता येत नाही. पावसाळ्यात हा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळतो.

भटवाडा धबधबा
भटवाडा धबधबा जांबोटीपासून आवघ्या तीन कि.मी.अंतरावर कालमणी फाट्याजवळ आहे. मुख्य रस्त्यागतचा हा धबधबा आहे. कौटुंबीक सहलींसाठी हा धबधबा सोयीचा ठरत असल्याने पावसाळ्यात या ठिकाणाला दररोज शेकडो पर्यटक भेट देऊन वर्षापर्यटनाचा आनंद लुटतात.

चोर्ला महामार्गावरील धबधबा
चोर्ला राज्य महामार्गावर घाटात गोवा हद्दीलगत अनेक असे लहान-मोठे धबधबे पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. या मार्गावरील प्रवाशी पावसाळ्यात या धबधब्यांखाली मनसोक्त डुंबण्याचा आनंद लुटतांना दिसतात. गोव्यातून सुध्दा मोठ्या प्रमाणात पर्यटक या परिसरात गर्दी करतात.

चिगुळे माऊली मंदिर
चिगुळे हे गाव विकसीत झाले नसले तरी येथील येथील माऊली मंदिर आणि डोंगराचा सुळका हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. मंदिराच्या मागच्या बाजुला दरी असून महाराष्ट्र राज्यातील अनेक गावे सहज दृष्टीस पडतात. कणकुंबीपासून पाच कि.मी. अंतरावरील हे ठिकाण कौटुंबीक सहलींसाठी सोयीचे आहे. वर्षा पर्यटनासाठी सुध्दा हे ठिकाण पर्यटकांना पर्वणीच ठरते.

विविध मागण्यांसाठी ३० रोजी समितीचे अधिकाऱ्यांना निवेदन
समांतर क्रांती / खानापूर सोमवारी (ता.३०) तालुक्यातील रस्ते, वीज आणि सरकारी रुग्णालयावर मराठीतून फलक लावण्याच्या मागणीचे निवेदन संबंधीत अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय आज शुक्रवारी (ता.२७) झालेल्या म.ए.समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते. प्रास्ताविक आणि स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. कार्याध्यक्ष […]