
समांतर क्रांती / खानापूर
Farmer injured in bear attack. सकाळी शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना माचाळी येथे घडली. या हल्ल्यात बाबल खांडेकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. लोंढा वनविभागात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
बाबल खांडेकर हे सकाळी ७ च्या सुमारास शेताकडे जात होते. यावेळी झाडीत असलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलाने त्यांच्या मांडीचा लचका तोडल्याने ते जखमी झाले. तरीही त्यांनी त्यातून सावरत अस्वलाच्या तावडीतून सुटका करून घेतली. जखमी आवस्थेत त्यांनी घर गाठल्यानंतर त्यांना तात्काळ लोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना खानापूर येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले.
अस्वल हल्ल्याच्या घटनेमुळे माचाळी परिसरात घबराट पसरली आहे. अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तसेच वनविभागासमोर अस्वलांसह श्वापदांना आवरण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
